37.7 C
Latur
Tuesday, May 7, 2024
Homeलातूरही निवडणूक जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी

ही निवडणूक जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी

किनगाव : प्रतिनिधी
जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही निवडणूक आहे. महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी ही निवडणूक आहे. शेतक-यांची कर्जमुक्ती करण्यासाठी ही निवडणूक आहे. महिलांना सुरक्षा व सन्मान मिळवून देण्यासाठी ही निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे ताकद उभी करावी, असे आवाहन ‘लातूर ग्रामीण’चे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे लातूर लोकसभेचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि. २५ एप्रिल रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तसेच देवकरा (ता. अहमदपूर) येथेही त्यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री विनायकराव पाटील, बालाजी रेड्डी, प्रमोद जाधव, विक्रांत गोजमगुंडे, ज्योती पवार, एन. आर. पाटील, गणेश कदम, राम बेल्लाळे, भाग्यश्री क्षीरसागर, शाम महाजन, सोमेश्वर कदम, संतोष बेंदरे, निलेश देशमुख, संभाजी रेड्डी आदी उपस्थित होते.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, गेल्या १० वर्षात मोठया आश्वासनांची भूरळ पाडण्यात आली. रोजगार देऊ, शेतीचे उत्पन्न दुप्पट करु, अशी स्वप्ने दाखवण्यात आले. पण, जनतेच्या हिताची कामे झाली नाहीत. शेतक-यांकडे तर साफ दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सत्ताधा-यांबद्दल जनतेच्या मनात असंतोष आहे. काँग्रेसचा जाहीरनामा लोकांना भावला आहे. त्याचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. देशात आमूलाग्र बदल घडवून आणणारा हा जाहीरनामा आहे. यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे रहावे.
डॉ. शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीबद्दल जनतेत उत्साह आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांना सोबत घेऊन डॉ. काळगे यांना मोठे मताधिक्य द्यावे. आपल्या भागातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आपला हक्काचा वाढपी डॉ. शिवाजी काळगे यांच्या रूपाने आपण संसदेत पाठवावा. ही निवडणूक आपल्या प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी आहे. यासाठीच हा लढा आहे, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.
विनायकराव पाटील म्हणाले, ही निवडणूक आपल्या भवितव्याची निवडणूक आहे. सध्याच्या सरकारच्या काळात पिळवणूक वाढली आहे. त्यामुळे आपण जागे होण्याची गरज आहे. लोकशाही टिकवण्यासाठी डॉ. काळगे यांना मतदान करावे. बालाजी रेड्डी यांनीही आपल्या भाषणात जागरूक राहून काँग्रेस, महाविकास आघाडीला मतदान करावे, असे आपल्या भाषणात आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR