38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeनांदेड५५ माजी नगरसेवक भाजपात

५५ माजी नगरसेवक भाजपात

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या ५५ निर्वाचित व स्विकृत नगरसेवकांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. स्वत: चव्हाण यांनीच शनिवारी दुपारी समाजमाध्यमांवर फोटो आणि प्रतिक्रिया पोस्ट करून नांदेडच्या राजकारणातली ही मोठी बातमी समोर आणली. त्यानंतर विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी याविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या ५२ माजी नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला होता. चव्हाण यांचे नांदेडला आगमन झाल्यानंतर कालपासून अनेक नगरसेवकांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर, काही नगरसेवकांनी आज झालेल्या एका बैठकीत भाजपला समर्थन देत असल्याचे जाहीर केले. चव्हाण यांच्या उपस्थितीतच या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आतापर्यंत निवडून आलेले व स्विकृत मिळून एकूण ५५ नगरसेवक भाजपमध्ये सामिल झाले आहेत. नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या मागील निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ८१ पैकी ७३ नगरसेवक निवडून आले होते. पुढील काळात त्यातील आणखी काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही सूतोवाच अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे.

दरम्यान, अशोकराव चव्हाण यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून भाजपमध्ये प्रवेश करणा-या नगरसेवकांचे स्वागत व अभिनंदन केले. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR