40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरलोकसभेच्या प्रचार सभांसाठी सोलापुरात १० मैदाने

लोकसभेच्या प्रचार सभांसाठी सोलापुरात १० मैदाने

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा होतील. त्याअनुषंगाने मैदान व जाहीर सभांसाठी शहरातील दहा मैदाने निश्चित करण्यात आली आहेत. तर कॉर्नर सभांसाठी १४ चौक राखीव ठेवले जाणार आहेत.
जाहीर सभांसाठी शहरात केवळ लक्ष्मी पेठेतील जुनी मिल कंपाउंड मैदान आणि पुंजाल मैदान हे दोनच मैदाने आहेत. तर आठ मैदानांची यादी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविली आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार्क स्टेडिअममध्ये झाली होती. पण, आता ते मैदान चकाचक केल्याने त्याठिकाणी कोणाचीही सभा होणार नाही. होम मैदानावर देखील सभा घेता येणार नाही, कारण या मैदानाचे नाव महापालिकेच्या यादीत नाही. केंद्रातील किंवा पक्षाचा वरिष्ठ नेता जाहीर सभेसाठी आल्यावर जागा मोठी लागते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माढा व सोलापूर या दोन्ही मतदारसंघासाठी एक सभा होवू शकते, असे भाजपमधील एका पदाधिकाऱ्याने सांगितले. पण, शहरातील मैदानांची स्थिती पाहता त्यांची सभा कोठे घ्यायची हा पेच आहे. १२ एप्रिलनंतर प्रचार रंगणार असल्याने भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सोलापूर व माढ्याच्या उमेदवाराचा प्रचार करण्याच्या निमित्ताने वारंवार सोलापूरमध्ये येतील, असेही सांगितले जात आहे.

जुनी मिल कंपाउंड ,कर्णिक नगर ,सावरकर मैदान
हुडको क्र. ३ क्रीडांगण,दाजी पेठ क्रीडांगण,संभाजी तलावालगत,परिवहन बस डेपो परिसर,जयभवानी प्रशाला,अल्ली महाराज मैदानआदी मैदाने राखीव ठेवण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार किंवा प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी कॉर्नर सभा घेतात. त्यांच्यासाठी महापालिकेने १४ ठिकाणे निश्चित केली आहेत. तेथील प्रत्येक कॉर्नर सभेसाठी साडेचार हजार रुपयांचे भाडे द्यावे लागणार आहे. त्या ठिकाणांमध्ये बाळीवेस चौक, जगदंबा चौक, विजापूर वेस चौक, नई जिंदगी चौक, सलगर वस्ती चौक, बेडरपूल चौक, कुमठा नाका चौक, जिल्हा परिषद गेट, माधव नगर चौक, विडी घरकूल चौक, दत्त नगर चौक, सम्राट चौक, दयानंद कॉलेज चौक, शेळगी चौक याचा समावेश आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे आमदार राम सातपुते तर माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही खासदारांचा विजय सोयीचा व्हावा या उद्देशाने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील या नेत्यांना सभांसाठी आमंत्रण दिले आहे.
आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या सध्या गावोगावी प्रचारसभा सुरू आहेत, पण उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सोलापूर शहर- ग्रामीणमध्ये वरिष्ठ नेते कोणकोणते येतील, यासंदर्भातील नियोजन अजूनही निश्चित झालेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR