38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरकमी मजुरीमुळे 'रोहयो'तील मजुरांनी काम सोडले

कमी मजुरीमुळे ‘रोहयो’तील मजुरांनी काम सोडले

सोलापूर : दुष्काळात गावागावातील बेरोजगारांवर घर सोडून परजिल्ह्यात जाण्याची वेळ येवू नये म्हणून ‘रोहयो’तून प्रशासनातर्फे कामे उपलब्ध करून दिली जातात.

परंतु, सरकारी नोकरदारांना महागाईमुळे महागाई भत्ता वाढीव मिळाला, सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढही झाली, मात्र ‘रोहयो’त (रोजगार हमी योजना) काम करणाऱ्यांची मजुरी केवळ १७ रुपयांनी वाढली. भर उन्हात ४१ अंश तापमानात काम करूनही दररोज २७३ रुपयेच मजुरी मिळत आहे. तीन दिवसांतच सोलापूर जिल्ह्यात ५४९ मजुरांनी काम सोडून दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून इतर तालुक्यांतील बाराशे महसूल मंडळांमध्येही दुष्काळसदृश स्थिती जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ३६ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ‘रोहयो’ची ३८८ कामे सुरू असून त्याठिकाणी सध्या नऊ हजार ९१४ मजूर काम करीत आहेत. तर राज्यातील साडेनऊ हजार कामांवरील मजुरांची संख्या चार लाख ३७ हजारांपर्यंत आहे. पावसाळ्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जमिनीतील पाणीपातळी सव्वामीटरने खोल गेली आहे.

दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून आता पाऊस पडेपर्यंत शेतीसाठी पाणी सोडता येणार नाही, अशी स्थिती आहे. पाण्याअभावी शेती ओस पडली असून पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची चिंता लागली आहे. मुलीचा विवाह, मुलांचे शिक्षण आणि बँक व खासगी सावकारांचा डोक्यावरील कर्जाचा बोजा या चिंतेतील गरजू लोक कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘रोहयो’च्या कामावर जात आहेत. पण, दिवसाला अवघी २७३ रुपयांची मजुरी मिळत असल्याने दिवसेंदिवस या कामांवरील मजूर कमी होत असल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यातील बार्शी, माढा, करमाळा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. उर्वरित सहा तालुक्यांमध्ये देखील दुष्काळाची दाहकता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी स्थलांतर केले असून अजूनही काहीजण स्थलांतराच्या तयारीत आहेत.

सद्य:स्थितीत रोजगार हमी योजनेच्या कामावर बार्शी तालुक्यात सर्वाधिक एक हजार ९९१, माढा तालुक्यात एक हजार ९९० तर पंढरपूर तालुक्यात एक हजार ८१७ मजूर काम करीत आहेत. मंगळवेढा, मोहोळ, करमाळा, अक्कलकोट या चार तालुक्यांमध्ये साडेसातशे ते सव्वाआठशे मजूर ‘रोहयो’वर काम करीत आहेत. मजुरी कमी असल्याने अनेकजण पर्यायी रोजगाराच्या शोधात आहेत.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सुरु असलेली कामे सुरु राहतील, त्याला आचारसंहितेची अडचण नाही. दुष्काळासंदर्भातील कामांसाठी आचारसंहितेचा अडथळा नाही. त्यामुळे पूर्वी मंजूर झालेली व सुरु असलेली कामे सुरू राहतील.असे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR