Homeलातूरसीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी रंगीत तालिम

सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी रंगीत तालिम

लातूर : प्रतिनिधी
आपत्कालीन परिस्थितीत विविध शासकीय विभागांमधील समन्वय आणि तत्परता तपासण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडच्या वतीने लातूर येथे ‘सीएनजी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर भव्य संयुक्त प्रात्यक्षिकाचे (मॉक ड्रील) आयोजन करण्यात आले होते. संभाव्य गॅस गळती आणि आग दुर्घटनेच्या वेळी आपत्कालीन यंत्रणा कशा प्रकारे कार्य करतात, याचे यशस्वी सादरीकरण यावेळी करण्यात आले. या रंगीत तालमीमध्ये एका सीएनजी वाहनाला गॅस गळतीमुळे आग लागल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच महानगर गॅसच्या कर्मचा-यांनी प्राथमिक स्तरावर आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महानगरपालिका अग्निशमन दल आणि पोलीस वाहतूक शाखा या यंत्रणांना त्वरित पाचारण करण्यात आले.
घटनेनंतर काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीची वैद्यकीय मदत देऊन रुग्णालयात हलविणे, वाहतूक पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करणे आणि अग्निशमन जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे, अशा टप्प्यांत ही मोहीम राबवण्यात आली. यातून विविध विभागांमधील अचूक समन्वय आणि जलद प्रतिसाद प्रणाली  दिसून आली.
या उपक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, महापालिका अग्निशमन अधिकारी बापूसाहेब जाधव, आनंद शिंदे, तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी अतुल डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपविभागातर्फे डॉ. प्रमोद पाटील यांनी या संपूर्ण प्रक्रियेचे सूक्ष्म निरीक्षण केले. महानगर गॅसचे लातूर व धाराशिव जिल्हा प्रमुख राकेश तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद शितोळे, समीर संकपाळ, पल्लव भुते, अक्षय कुचेकर आणि संतोष हल्लाळे यांनी या रंगीत तालमीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम  घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR