30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरमाढा मतदारसंघात अभयसिंह जगताप बंडाच्या पवित्र्यात

माढा मतदारसंघात अभयसिंह जगताप बंडाच्या पवित्र्यात

रणजित जोशी
सोलापूर : प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी धैर्यशील मोहिते-पाटील यांना मिळणार हे समजताच पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुस-या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिली जात असल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा तिकिट दिले. या मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते-पाटील हे नाराज झाले. त्यांनी अखेर तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू अभयसिंह जगताप शरद पवार गटाकडून माढा लढविण्यासाठी इच्छुक होते. काही महिन्यांपासून त्यांनी या मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात आपला संवाद दौराही सुरू ठेवला होता. परंतु तिकिट मोहिते पाटील यांना मिळत असल्याचे समजताच ते नाराज झाले. आता त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे.

याबाबत जगताप म्हणाले की, उमेदवारी देताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. भाजपमध्ये उमेदवारी मागणारे व भाजपातून आलेल्यांना जर पक्षात उमेदवारी दिली जात असेल तर हे पक्षाच्या विचारसरणीला धरून नाही. आम्ही पक्षाचे काम करीत असताना आता उमेदवारीसाठी धडपडणारे दुस-या पक्षाचे काम करीत होते. त्यांनाच जर पुन्हा आमच्या पक्षातून उमेदवारी दिली जाणार असेल तर आम्ही शांत का बसावे. कालपर्यंत ज्यांना आपण भ्रष्टाचारी म्हणून आवाज उठवत होतो त्यांनाच आज आपला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करणे हे अन्यायकारक आहे.

जगताप म्हणाले की, भाजपने तिकिट नाकारल्यामुळेच ते तिकिटासाठी पक्षप्रवेश करणार आहेत. कालपर्यंत संघाचा प्रचार करणारे आज लगेच गांधीवादी कसे झाले? फुले, आंबेडकरांची विचारधारा असणा-या पक्षाने लगेच बटण दाबल्यासारखी विचारधारा कशी बदलू शकते हे समजत नाही. विचारधारा बदलण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यांच्याकडे कारखाने असल्यामुळे त्यांना उमेदवारी देणार का? आजही त्यांच्या कुटुंबातील सदस्य देवेंद्र फडणवीस यांचे आमच्यावर उपकार आहेत अशी भाषा बोलत असतील तर अशांनाच उमेदवारी का दिली जात आहे, असा प्रश्नही जगताप यांनी विचारला आहे.

वरकुटे-मलवडी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरद पवार आणि पक्षाने माझ्या निष्ठेचा विचार केला नसल्याची खदखदही अभयसिंह जगताप यांनी बोलून दाखवली. वरकुटे-मलवडीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, माण खटाव, कोरेगाव या तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी जगताप यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी काहीही झाले तरी लढायचेच. पवार यांनी तिकिट दिले नाही तर अपक्ष का होईना पण लढायचेच अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. वेळप्रसंगी बंड करण्याचे संकेत देखील दिले आहेत. त्यामुळे अभय जगताप यांचे होऊ घातलेले बंड शरद पवार यांची माढा लोकसभा मतदार संघाच्या दृष्टीने डोकेदुखी वाढवणार का?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR