40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeपरभणी  वाळू खाऊन विकासाची माती केली : कृषिमंत्री धनंजय मुंडे

  वाळू खाऊन विकासाची माती केली : कृषिमंत्री धनंजय मुंडे

परभणी / प्रतिनिधी
परभणी जिल्ह्याला मोठे वैभव लाभलेले आहे. मात्र खासदारांनी मागील २० वर्षांत केवळ वाळू खाऊन जिल्ह्याच्या विकासाची माती करण्याचेच काम केले असल्याची टीका कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ अक्षता मंगल कार्यालयात आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. मेघना बोर्डीकर, आ. रत्नाकर गुट्टे, माजी खा. सुरेश जाधव, माजी आ. हरिभाऊ लहाने, माजी आ. रामराव वडकुते आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, परभणीचे राजकारण अजबच आहे. त्यासाठी जगातील सर्व राजकीय पक्षांनी मिळून एक समिती स्थापन करून परभणीचे राजकीय समीक्षण केले पाहिजे. आतापर्यंत या जिल्ह्यात ‘खान’ पाहिजे का ‘बाण’ यावरच निवडणुका जिंकल्या पण आता विकासाची जान असणा-या महादेव जानकर यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्यावर होणे अपेक्षित होती परंतु निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यावेळी पंतप्रधानांनी जात कधीच पाहिली नाही. परंतु आता जाती-पातीचे राजकारण कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परभणी जिल्ह्याला वैभव लाभलेले आहे मात्र लोकप्रतिनिधींनी वाळू खाऊन जिल्ह्याच्या विकासाची माती केल्याचा आरोप खा. संजय जाधव यांचे नाव न घेता केला. महादेव जानकर यांचे थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी जवळचे संबंध आहेत तर येथील लोकप्रतिनिधींचे संबंध वाळूमाफीयांशी असल्याची टीकाही त्यांनी केली. या संवाद मेळाव्यासाठी व्यापारी, डॉक्टर, वकील, कर सल्लागार यांच्यासोबत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR