मुंबई : भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दिग्गज गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून संगीतप्रेमींनी एक अमूल्य ठेवा गमावला आहे.
आशा भोसले या त्यांच्या वर्सेटाइल गायनशैलीसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांनी हजारो गाणी गाऊन आपल्या आवाजाच्या जादूने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रोमँटिक, गझल, भजन, पॉप, कॅबरे अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपली वेगळी छाप सोडली.
आशा भोसले यांनी अनेक नामांकित गायकांसोबत गाणी गायली, मात्र एक खास गोष्ट म्हणजे त्यांनी ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांच्यासोबतही गाणे गायले होते. दोघांनी मिळून ‘यू आर द वन फॉर मी’ हे गाणं सादर केलं होतं.
विशेष म्हणजे हे गाणं हिंदीत होतं आणि त्याचे बोल स्वत: ब्रेट ली यांनी लिहिले होते. हे गाणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २००६ दरम्यान रिलीज झाले होते आणि त्यावेळी ते विशेष चर्चेत आले होते. ब्रेट ली हे क्रिकेटविश्वातील एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १०३४ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये फर्स्ट क्लास, लिस्ट ई आणि टी २० क्रिकेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी ७१८ विकेट्स घेतल्या ७६ कसोटीत ३१०, २२१ वनडेत ३८० आणि २५ टी-२० सामन्यांत २८ विकेट्स घेतल्या.
सचिन तेंडुलकरशी खास नाते
आशा भोसले यांचे सचिन तेंडुलकर यांच्याशीही खास नाते होते. त्या सचिनला क्रिकेटचा सर्वात मोठा कलाकार म्हणत असत. १९९२ आणि २०२३ च्या वर्ल्ड कपशी संबंधित कार्यक्रमांमध्ये त्या सचिनसोबत दिसल्या होत्या. आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा आवाज, त्यांची शैली आणि त्यांनी दिलेला अमूल्य वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या आठवणी आणि गाणी कायमच रसिकांच्या हृदयात जिवंत राहतील.

