38.4 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळांची माघार

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळांची माघार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मानले आभार

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेतला असून, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढविणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की होळीच्या दिवशी अजितदादा पवार यांचा निरोप आला म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली.

त्यांनी दिल्लीचा निरोप दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली. बैठकीत नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली, तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळ यांच्यासाठी जागा मागितली; परंतु अमित शहा यांनी माझं नाव सांगितलं. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी मी एक दिवसाची वेळ मागितली. मात्र, दुस-या दिवशीही माझेच नाव फायनल झाल्याचं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी नाशिकला येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मते जाणून घेतली. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीच्या नेत्यांनी उमेदवार जाहीर करावा
ते म्हणाले, की नाशिकमध्ये माझी विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. नाशिकच्या विकासासाठी मराठा, दलित, ब्राह्मण, ओबीसी यासह सर्व समाजांनी पाठिंबा दिला. त्यानुसार आम्ही तयारी करण्यास सुरुवात केली. मात्र, तीन आठवड्यांचा वेळ होऊन उमेदवारी जाहीर झाली नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारही सुरू झाला असून, तीन आठवड्यांपासून ते मतदारसंघात फिरत असून, त्यांचा प्रचार पुढे गेला आहे. अधिक उशीर होत असल्याने महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

सर्वांचे आभार…
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, की मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुचवले होते. त्यांनी दाखविलेल्या आग्रहाबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच, नाशिकच्या विकासाकडे पाहून मराठा समाजासह विविध समाजबांधव, विविध पक्षांचे नेते व पदाधिका-यांनी मला जो पाठिंबा दिला, त्यांचेही आभार मानतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR