38.4 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे शहरात सलग चौथ्या दिवशी गोळीबार

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी गोळीबार

पुणे : हॉटेलमध्ये पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने सराईतांनी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री येरवडा भागात घडली. या गोळीबारात विकी राजू चंडालिया (रा. जय जवान नगर, येरवडा) हा तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, आकाश चंडालिया, अक्षय चंडालिया, अमन चंडालिया, अभिषेक चंडालिया (सर्व जण रा. रेंजहिल्स, पुणे), सुशांत कांबळे (रा. पर्णकुटी सोसायटी, येरवडा), संदेश जाधव आणि संकेत तारू (दोघे रा. जय जवान नगर, येरवडा) अशी आरोपींची नावे आहेत.

गोळीबार वैयक्तिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी आकाशवर यापूर्वी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस हद्दीत गुन्हे दाखल आहेत. तो सहा महिन्यांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून बाहेर आला आहे. येरवड्यातील अग्रसेन शाळेसमोर पर्णकुटी सोसायटीजवळ गीता भोसले यांचे व्हीआरफोरयू नावाचे हॉटेल आहे. हॉटेलचे सर्व काम विकी पाहतो. आरोपी आकाश विकीचा लहानपणीचा मित्र आहे.

आठ दिवसांपूर्वी आकाशने हॉटेलमध्ये येऊन विकीकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी विकीने पैसे देण्यास नकार दिला. आकाशने त्याला दम दिला. स्थानिक नागरिकांनीदेखील यापूर्वी हॉटेलसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. परिसरात लूटमार, दहशत निर्माण करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR