39.5 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeलातूरदेशाच्या लोकसभा सभागृहात चाकूरने दिले तब्बल अठरा खासदार!

देशाच्या लोकसभा सभागृहात चाकूरने दिले तब्बल अठरा खासदार!

लोकसभेत सर्वाधिक चाकूरचे भूमिपुत्र जाण्याचा विक्रम!

अ.ना.शिंदे : चाकूर
– देशाची नीती ठरवणा-या लोकसभा सभागृहात खासदार म्हणून तब्बल १८ वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी महाराष्ट्रातील चाकूरच्या भूमिपुत्राला मिळाली असून यात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह तिघांनी लोकसभेत १४ वेळा प्रतिनिधित्व केले आहे. तर तालुक्यातील कडमुळी येथील भूमिपुत्राला दोन वेळेस तर नळेगाव व घरणी येथील भूमिपुत्राला प्रत्येकी एकवेळेस लोकसभेत खासदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे एकाच गावातील रत्नांना तब्बल १८ वेळा देशाचे सर्वोच्च सभागृह गाजवण्याची संधी कदाचित देशात पहिलीच असेल. त्यामुळे चाकूरची ओळख रत्नांची खाण म्हणून झाली आहे.

पूर्वी लातूर जिल्ह्याचा धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद)लोकसभा मतदारसंघात समावेश होता. व उस्मानाबाद राखीव लोकसभा मतदारसंघातून चाकूरचे भूमिपुत्र कै. तुळशीराम कांबळे यांना १९६२, १९६७ आणि १९७२ च्या पंचवार्षिक निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळवून खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. चाकूरचे कै. अ‍ॅड. टी. एस. शृंगारे बाबा (मूळ गाव नळेगाव, ता. चाकूर)यांनी १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व केले व त्यांच्या रूपाने मराठवाड्याला पहिल्यांदा केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेत लातूर लोकसभा मतदारसंघ खुल्या प्रवर्गास सुटला.

इ.स. १९८० मध्ये चाकूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांना लोकसभेची संधी मिळाली. त्यांनी १९८० ते २००४ दरम्यान सलग सात निवडणुकीत विजय संपादन करीत संरक्षण राज्य मंत्री, वाणिज्य मंत्री, विज्ञान व तंत्रज्ञान, अणूऊर्जा स्पेस मंत्री, संरक्षण उत्पादन, नागरी विमान वाहतूक व पर्यटन मंत्री, लोकसभा सभापती, राज्यपाल अशा केंद्रातील बहुतेक सर्व सर्वोच्च पदांना गवसणी घातली. सलग सात वेळा लोकसभेत खासदार म्हणून प्रतिनिधित्व करीत या काळात त्यांनी केंद्रातील विविध मंत्रिपदांसह लोकसभा सभापती म्हणून कार्य केले. त्यानंतर राज्यसभेत प्रतिनिधित्व करीत देशाच्या गृहमंत्रिपदाची धुरा शिवराज पाटील चाकूरकर यांनी सांभाळली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान राहिले आहे.

तर उस्मानाबाद राखीव लोकसभा मतदारसंघातून कै. तुळशीराम कांबळे यांचे सुपुत्र कै. अरविंद कांबळे यांनी १९८४, १९८९, १९९१ आणि १९९८ मध्ये लोकसभेत उस्मानाबादचा खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व केले. त्यापूर्वी राज्यात त्यांनी उपमंत्रिपदही भूषवले होते. तालुक्यातील कडमुळी (ता.चाकूर)चे मूळ भूमिपुत्र संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी २०१४ व २०१९ मध्ये परभणीचे खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. तर घरणी(ता.चाकूर) येथील सुधाकर शृंगारे यांनी २०१९ मध्ये लातूरचे खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे.
एकाच चाकूर गावातील तिघांसह एकूण सहा जणांनी तब्बल अठरा वेळा लोकसभेत खासदार म्हणून बहुमान मिळवण्याचा दुर्मिळ योग चाकूरच्या भूमिपुत्राला मिळून देशात विक्रम झाला आहे. तर येथील नेतृत्वाने देशाच्या लोकसभा सभागृहात कर्तृत्व गाजवल्याने चाकूर गुणवंत व यशवंत नेतृत्वाची खाण ठरली आहे. यावेळी पुन्हा खासदार सुधाकर शृंगारे लातूर लोकसभा मतदारसंघातून तर संजय ऊर्फ बंडू जाधव परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR