30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपी कायदा गुंडाळला

सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपी कायदा गुंडाळला

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गेल्या दोन म हिन्यांपासून गाळप झालेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. अद्यापही जिल्ह्यातील २३ कारखान्यांकडे ३१ मार्चअखेर ४५१.६९ कोटी रुपये एफआरपी थकली आहे. शेतकऱ्यांना मार्चअखेरपर्यंत बँका, पतसंस्था भरण्यासाठी व शेतीच्या कामासाठी लागणारा पैसा पाहिजे असतो. परंतु कारखान्यांकडून ऊसबिले न आल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांनी १५ टक्के व्याजासह ऊस बिले द्यायला हवी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

जिल्ह्यातील ३५ पैकी ३२ कारखान्यांचा या वेळचा गळीत हंगाम संपलेला आहे. तथापि, बहुसंख्य कारखान्यांनी अजूनहीऊसबिले थकवली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पैसे हातात येणार या गृहीताने वर्षभर केलेला खर्च, बँकांची कर्जे, उसनवारी याची परतफेड करण्याचे नियोजन केलेले असते. मात्र ऊसबिलेच न मिळाल्याने या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. फेब्रुवारी, मार्चमध्ये गाळप झालेल्या उसाची बिले अनेक कारखान्यांनी दिली नाहीत. काही कारखान्यांकडे जानेवारीतील बिले थकली आहेत.

मार्च अखेरच्या धामधुमीत या शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा चांगलाच ससेमिरा सुरू होता. बँकांच्या कर्जाचे हप्ते, परतफेड, पाणीपट्टीचा खर्च, खतांसाठी, मशागतीसाठी केलेल्या उधार खर्चाची वसुली यासाठी तगादा सुरू झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. सहकारी तसेच खासगी कारखानदाराकडून ऊस बिले थकवण्याच्या समस्येमुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी भयंकर त्रस्त झाले असून कारखानदारांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केल्यानंतर त्यांच्या उसाचे एफआरपीप्रमाणे होणारे ऊस बिल १४ दिवसांच्या आत अदा करणे, हे कायद्याने बंधनकारक आहे. तसा कायदा अस्तित्वात असतानाही साखर कारखानदारांना याचा विसर पडला आहे व ते शेतकऱ्यांची बिले थकवावीत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तात्काळ शेतकऱ्यांची उस बिले १५ टक्के व्याजासह देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR