38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरकृषी प्रधान देशात शेतकरी संकटात, भाजपाचे धोरण चुकीचे

कृषी प्रधान देशात शेतकरी संकटात, भाजपाचे धोरण चुकीचे

अहमदपूर मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. शिवाजीराव काळगेंची हवा

अहमदपूर: रविकांत क्षेत्रपाळे
आपला देश कृषीप्रधान देश असून या देशातील शेतकरी आज देशोधडीला लागला आहे .बी- बियाणे खतांचे भाव वाढले ,पेट्रोल- डिझेल भडकले, दोन वर्षात शेतक-यांना विमा दिला नाही, गॅस सबसिडी बंद, गॅसचे दर वाढले, शेतीमालावर जीएसटी लावली, शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही, मराठा हटकर, धनगर, माळी समाजास आरक्षण मिळाले नाही, इन्कमटॅक्स मर्यादा वाढविली नाही. यामुळे शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार संकटात सापडल्यामुळे भाजपा सरकार राबवित असलेले धोरण शेतक-यांचे कंबरडे मोडणारे व चुकीचे धोरण लक्षात आल्यामुळे अहमदपूर मतदारसंघात सध्या महाआघाडी सरकारचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांचे वारे वाहू लागले आहे.

मागच्या निवडणुकीच्या वेळी मोदी सरकारने शेतक-यांच्या कोप-याला चांगला गुळ लावला होता. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमीभावाचा कायदा करणार पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. यामुळे राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या मात्र खूप वाढल्या. सोयाबीन, कांदा, कापूस या मालाला कवडीमोल मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. केंद्र सरकार शेतक-यांपेक्षा उद्योगपतींची काळजी जास्त घेत असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले आहे. यामुळे यावेळी शेतकरी प्रचंड नाराज असून ही शेतक-यांची नाराजी भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे यांना भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्याच्या लातूर लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांची तुलना केली तर खा. सुधाकर शृंगारे यांना आपल्या जिल्ह्याचे महत्त्वाचे विकासाचे प्रश्न काय आहेत, हे संसदेत कशा पद्धतीने मांडले पाहिजेत आणि मागील पाच वर्षाच्या काळात मतदारसंघाचा काय विकास केलेला आहे, पुढे काय करू शकतो याचेही ज्ञान असणे उमेदवाराला आवश्यक आहे. पण असे मतदारसंघात कुठेही काहीही विकासाची कामे झाल्याचे चित्र पहावयास मिळत नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी उमेदवार हा श्रीमंत नाही तर विकासाची दूरदृष्टी असलेला तो हुशार, ज्ञानी, अभ्यासू असला पाहिजे. लातूर मतदारसंघाचे सध्याचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे हे सुशिक्षित ,बुद्धिमान ,हुशार प्रश्न मांडण्याची क्षमता असलेले ,विकासाची दृष्टी असलेले हिंदी, इंग्रजीतून भूमिका मांडता येणारे आहेत.

सध्या मतदारसंघातील शेतकरी प्रचंड तणावात ,आर्थिक अडचणीत ,संकटात वावरत असल्यामुळे यावेळी मतदारसंघात भाजपाचे वारे बंद होऊन काँग्रेसचे वारे चांगले वाहू लागले आहे. गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघात मतदारांनी भाजपाला भरभरून मतदान केले पण सर्वांचा भ्रमनिराश झालेला आहे.

मतदारसंघात कुठल्याही भागात नवीन विकासाचा प्रकल्प आणण्यामध्ये भाजपाचे उमेदवार अपयशी ठरलेले आहेत. यामुळे शेतकरी, नवतरुण, सुशिक्षित बेरोजगार ,महिला, नोकरदार सर्व नाराज आहेत. ही नाराजी खासदार सुधाकर शृंगारे यांना व भाजपा पक्षाला परवडणारी नाही. या नाराजीचा फायदा काँग्रेस उमेदवार डॉ. शिवाजीराव काळे यांना होणार असल्याचे सर्व मतदार बांधव बोलत असताना ऐकावयास मिळत आहे. काँग्रेस उमेदवारांसाठी मतदारांची सुप्त लाट उफाळून येणार असल्याचे चित्र सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR