30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeनांदेडगुडघ्याला बाशिंग बांधून इच्छुकांची धावपळ

गुडघ्याला बाशिंग बांधून इच्छुकांची धावपळ

कंधार : सय्यद हबिब
लोकसभा मतदारसंघाचा आवाका इतका मोठा आहे की, मतदार संघात सर्वत्र पोहोचणे उमेदवाराला शक्य होणार नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे सर्वच उमेदवाराची मदार ही स्थानिक कार्यकर्त्यांवर आहे. येत्या २६ एप्रिलला नांदेड तर ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.

मुखेड विधानसभा आणि लोहा विधानसभा मतदार संघ हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ कंधार तालुका पूर्णत: वाटला गेला असून निवडणुकीचे प्रचार अभियान जोमात सुरू झाले आहे. मात्र निवडणूक लोकसभेची असली तरी आगामी काळात होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून इच्छूक भावी आमदार चांगलीच धावपळ करतांना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुक येत्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. यामुळे नेते पुढारी प्रचारात गुंतलेले आहेत. आपल्याच पक्षाचा विजय व्हावा, यासाठी अहोरात्र शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र हे स्थानिक कार्यकर्ते काम करताना अनेकांशी वादही घालतात. त्यामुळे त्यांचा परिणाम हा उमेदवारांच्या मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांना आपल्या संपर्कात ठेवण्याचे कसब उमेदवारांना दाखवावे लागत आहे. लोकसभेच्या रणसंग्रामात जणू विधानसभेची तयारी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेले भावी आमदार आतापासूनच आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विधानसभा क्षेत्रातील गावागावात प्रचार करतांना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व भावी एका मंचावर येत असले तरी त्यांचे मात्र मनोमिलन झाले नसल्याचे पाहावयास मिळत आहे. आपआपले कार्यकर्ते आपल्याच संपर्कात रहावे, या दृष्टिकोनातून ते सध्या प्रचार करत असल्याचे जाणवत आहे. लोकसभेनंतर विधान सभेचा बिगुल वाजणार आहे. यामुळे या लोकसभेच्या निकालावर विधानसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या लोकसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारासाठी भावी इच्छूक आमदार कार्य करीत असले तरी आगामी विधानसभा निवडणुकपर्यंत आपले मतदार आपल्या सोबत राहावेत, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर कोण किती पाण्यात आहे, हे स्पष्ट होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR