34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयतोल मोल के बोल!

तोल मोल के बोल!

काही माणसं मोठी मजेशीर असतात. त्यांची तोंडाची बडबड सारखी सुरू असते. ते जिभेवरचा तीळही भिजू देत नाहीत. त्यात तोतरेपणा असेल तर मग विचारूच नका! भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ही व्यक्ती त्यापैकीच एक. त्यांची बडबड सुरू झाली आणि त्यात तोतरेपणाची भर पडली की त्यांना बोलण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागत आहेत असेच वाटते. या व्यक्तीने काही दिवस राजकारण चांगलेच गाजवले आहे. त्याने आपल्या कारनाम्यांमुळे ब-याच व्यक्तींना हादरवून सोडले आहे. भ्रष्टाचार खोदून काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. सोमय्यांनी तोंड उघडले की एखादे गुपित बाहेर येणारच. गौप्यस्फोट करण्यात ते माहिर आहेत. वास्तविक पाहता भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधून काढण्यासाठी ईडी, सीबीआय, आयकर विभाग यासारख्या तपासयंत्रणा, संस्था अस्तित्वात आहेत.

परंतु सोमय्या म्हणजे चालता-बोलता इतिहास नव्हे वर्तमानच! ते कधी कोणता गौप्यस्फोट करतील आणि एखाद्याला गोत्यात आणतील ते सांगता येत नाही. उद्धव ठाकरेंचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा आदेश फडणवीसांनीच मला दिला असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी नुकताच केला आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गुपित फोडले. भाजपने उद्धव ठाकरे यांच्याशी युती तोडली आणि अनेक पक्ष फोडून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढल्याने अनेकांच्या मनात भाजपबद्दल रोष असतानाच भ्रष्टाचाराची प्रकरणे खोदून काढण्यात आघाडीवर असलेले किरीट सोमय्या यांनी हा स्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच मला उद्धव ठाकरेंशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधून काढण्याचा आदेश दिला होता. सुरुवातीस मी तसे करण्यास नकार दिला मात्र हा पक्षाचा आदेश आहे असे त्यांनी मला बजावले आणि मला कामाला लावले असे सोमय्या म्हणाले. मुंबई महापालिकेतील उबाठा सेनेचे घोटाळे बाहेर काढण्याचा आदेश फडणवीस यांनी दिला होता.

यावर मी पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढतो मात्र, ठाकरे कुटुंबाला यापासून आपण दूर ठेवूया असे फडणवीसांना म्हणालो होतो परंतु पक्षाचा आदेश आहे असे ते म्हणाल्याने मला तसे करावे लागले असेही सोमय्यांनी म्हटले आहे. आपण भाजपचा शिस्तीचा कार्यकर्ता असून पक्षाने जो आदेश दिला तो पाळत गेलो. हसन मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार असो किंवा ‘मातोश्री’ संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे असोत आपण एक-एक प्रकरण काढत राहिलो. राज्यात मविआचे सरकार असताना सोमय्या यांनी सत्ताधारी नेत्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड केली होती आणि त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला होता. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून सोमय्या प्रसिद्धीपासून थोडे दूर राहिले आहेत. मात्र, आता त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावरही बोट ठेवले आहे. ते म्हणाले, गत दीड-दोन वर्षात या सरकारनेही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. कारण व्यक्ती तर त्याच आहेत… म्हणजे आघाडीतील अनेक नेते आज महायुतीत आहेत. तिकडचे घोटाळेबाज लोकच तुम्ही घेतले आहेत! ठाकरे सरकारच्या काळात ३३ महिने जे काही चालू होतं तेच पुढे चालू राहिलं असतं तर सोमय्या हिरो झाला असता परंतु राज्याची वाट लागली असती. राज्याची वाट लागू नये म्हणून मी काही तडजोडी केल्या असेही सोमय्या म्हणाले.

‘मातोश्री’चा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश दिल्लीहून आले होते तसेच फडणवीस यांनीही सांगितले होते अशी माहिती सोमय्या यांनी दिली. भाजपच्या निवडणूक प्रचाराचा जोर अन्य मुद्यांसोबत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरही आहे. त्यामुळे बिहारमध्ये निवडणूक प्रचाराच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधकांवर विशेषत: लालुप्रसाद यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आम्ही ‘भ्रष्टाचार हटाओ’ असे म्हणतो तर विरोधक ‘मोदी हटाव’ म्हणत आहेत. मोदी सरकारच्या काळात भ्रष्टाचार न झाल्यामुळे सगळा पैसा विकासाच्या कामासाठी वापरला गेला. आज देशात जी मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली दिसतात, त्याचे मूळ भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात आहे हे खरे असले तरी भाजपने जे ‘इन कमिंग’ सुरू केले आहे त्यात अन्य पक्षातील भ्रष्टाचारी नेते सामील होत आहेत त्याचे काय? भाजपने गत दशकात अत्यंत खालची पातळी गाठत खुनशी व कपटी राजकारण करून विरोधकांना संपवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेला हाताशी धरून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ब्लॅकमेल केले आहे यात शंका नाही. भाजपच्या या कपटी राजकारणाविरुद्ध काँगे्रसने सातत्याने आवाज उठवला. हेच सत्य आता किरीट सोमय्यांच्या मुखातून बाहेर पडले आहे.

विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यामागे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा हात होता हे सोमय्या यांनीच उघड केल्याने कपटी राजकारणाचा बुरखा फाडला गेला आहे. या निमित्ताने फडणवीस यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली महाराष्ट्रात पद्धतशीरपणे एक रॅकेट चालवण्यात आले. या रॅकेटचे खलनायक फडणवीस असल्याचे आता लपून राहिलेले नाही. महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा लाभली आहे. या परंपरेला फडणवीस यांनी काळिमा फासला आहे. सोमय्या यांनीच हे सारे उघड केल्याने भाजपची भ्रष्टाचारविरोधातील लढाई ही केवळ विरोधकांना संपवण्यासाठीच होती हे स्पष्ट झाले आहे. भ्रष्टाचा-यांना सोडायचे नाही पण त्यांना ब्लॅकमेल करून भाजपात सन्मानाने प्रवेश द्यायचा हाच त्यांचा राजकीय अजेंडा आहे. सोमय्याचा कारनामा पाहून भाजपवाले म्हणत असतील… तोल मोल के… बोल बाबा!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR