29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeनांदेडघाणेरडे राजकारण करणा-या भाजपला गाडा अन् काँग्रेसला विजयी करा

घाणेरडे राजकारण करणा-या भाजपला गाडा अन् काँग्रेसला विजयी करा

बारड येथील सभेत आ. अमित देशमुख यांचे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी
भाजपाने महाराष्ट्रासह सोळा सरकारे पाडली, दुर्दैवाने या घाणेरड्या राजकारणाला नांदेड बळी पडले हे वाईट झाले. नांदेडचे नेतृत्व भाजपात गेले म्हणून चिंता करू नका. तुमच्या पाठिशी सोनिया गांधी, राहुल गांधींपासून स्वत: अमित देशमुख आहेत. एक नांदेडकर भाजपात गेला पण लाखो नांदेडकर आहेत तिथेच आहेत हे दाखवून देत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री आ. अमितभैय्या विलासराव देशमुख यांनी केले.

काँग्रेस महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ बारड येथे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची जाहीर विजय संकल्प सभा दि. २१ रोजी पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना आ. अमित देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव करून इंडिया आघाडीला मजबूत करेल. या क्रांतीचा केंद्रबिंदू नांदेड असेल. नांदेडला लढवय्यांचा, क्रांतिकारकांचा, संतांचा इतिहास आहे.

याला अलिकडे गालबोट लागले पण हे गालबोट मिटविण्यासाठी तुम्हाला पुढे यावे लागेल. ही लढाई आहे, ही क्रांती आहे आणि या लढाईचा, क्रांतीचा चेहरा वसंतराव चव्हाण आहेत. त्यांना विजयी करून ही लढाई जिंकायची आहे, हे लक्षात ठेवावे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेड येथे आले पण मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणाबद्दल ब्र काढला नाही, महागाई, बेरोजगारी, शेतमालाच्या भावाबद्दल बोलले नाहीत. ते केवळ सामान्य माणसाच्या संबंधित नसलेल्या संदर्भहीन मुद्यावर बोलले आणि निघून गेले, अशा नेतृत्वाच्या मागे राहून मत वाया न घालता काँगे्रस उमेदवारास विजयी करा, असे आवाहन केले. यावेळी लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण, आ. मोहन हंबर्डे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.

स्व. साहेबराव बारडकर यांच्या आठवणींना उजाळा
बारडशी आपले कौटुंबिक नाते आहेच पण, जेव्हा पहिल्यांदा स्व. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होत होते तेव्हा स्व. साहेबराव बारडकर यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. अशी आठवण आ. अमित देशमुख यांनी भाषणात करून दिली. स्व. साहेबराव बारडकर यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या परिवारासह वसंतराव चव्हाण हे पुढे नेणारे व्यक्तिमत्त्व आहे, असे देखील आ. अमित देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR