30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमविआ व महायुतीत कांटे की टक्कर

मविआ व महायुतीत कांटे की टक्कर

सातारा : डॉ. राजेंद्र भस्मे

सातारा लोकसभा मतदारसंघात खरी लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यातच होणार आहे. सातारचा गड भाजपसाठी आजवर अभेद्य असल्यामुळे उदयनराजे यांच्यासह भाजपने साता-याची लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे आता घटक पक्षांची एकजूट उभी करण्याचे आव्हान महायुतीपुढे असणार आहे. त्यामुळे राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी सातारची एक असणार आहे.

सातारा मतदारसंघातून २००९पासून उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रतिनिधित्व करत होते. विशेषत: २००९ व नंतरच्या २०१४च्या मोदी लाटेतील निवडणुकीतही चढत्या क्रमाने मताधिक्य घेत ते विजयी झाले होते. मात्र, २०१९च्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य कमालीचे घटले. निवडून आल्यानंतर तीन-चार महिन्यांतच त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात त्यासाठी भाजपकडून मोठ्याप्रमाणात प्रयत्न सुरू होते. उदयनराजे यांनी भाजपमध्ये यावे, यासाठी भाजपने टाकलेल्या मोहजालात उदयनराजे कसे अडकले, हेच एक मोठे कोडे आहे. पोटनिवडणुकीत त्यांना निवडून आणून केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाईल, अशी चर्चा त्यावेळी सुरू होती. पोटनिवडणुकीत भाजपचा अपेक्षाभंग झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणेदेखील भाजपसोबत आले असल्याचा डांगोरा पिटून त्याचा राजकीय लाभ भाजपला घ्यायचा होता आणि दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला हानी पोहोचवायची होती. त्यासाठीच त्यांनी उदयनराजे यांना गळ टाकला होता. उदयनराजे त्या गळाला लागले आणि त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या कृतीबद्दल मतदारसंघात नकारात्मक भावनेचे बीज रोवले गेले. त्याचा फटका त्यांना पोटनिवडणुकीत बसला.

राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्याकडून त्यांचा सपशेल पराभव झाला. सदासर्वकाळ आम्हाला गृहीत धरू नका, असा संदेशच मतदारांनी या निकालातून दिला. भाजपसाठी हा मोठा अपेक्षाभंग होता. या पराभवानंतर काही काळाने भाजपने उदयनराजे यांना राज्यसभेवर घेतले खरे; मात्र आजअखेर त्यांना केंद्रीय मंत्रिपद काही मिळाले नाही. त्या पराभवाची सल उदयनराजे यांना होती. त्यामुळे लोकांमधून पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेची तयारी केली होती. मात्र, आधी त्यांच्या पक्षप्रवेशासाठी आतुर झालेल्या आणि त्यांच्यासाठी पायघड्या घालणा-य भाजपकडून उमेदवारीसाठी त्यांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवले गेले. अखेर १२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १६ एप्रिलला भाजपकडून उदयनराजे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, दोन्ही बाजूंनी गाठीभेटी, पदयात्रा, सभा यांचा धडाका सुरू झाला आहे.

समाजमाध्यमांवरून वार-प्रतिवार
प्रत्यक्ष मैदानावरील प्रचाराबरोबरच समाजमाध्यमांवरूनही वार-प्रतिवार सुरू झाले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी एकदिलाने प्रचार मोहीम राबवली जात असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, मावळते खासदार श्रीनिवास पाटील, अ‍ॅड. उदयसिंह पाटील, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षद कदम, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे जिवाचे रान करत आहेत. तर, दुसरीकडे महायुतीत सर्वकाही आलबेल असे दिसत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR