30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रगाडीमध्ये गुदमरल्याने दोन भावंडांचा मृत्यू

गाडीमध्ये गुदमरल्याने दोन भावंडांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील अ‍ॅन्टॉप हिल या परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. या परिसरात धूळ खात पडलेल्या एका गाडीमध्ये दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ही दोघे भावंडं असल्याचे समोर आले असून त्यांची नावे साजिद आणि मुस्कान अशी आहेत. बुधवारी दुपारी हे दोघे घराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात खेळत असताना अचानक बेपत्ता झाले होते. सायंकाळी या दोघांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान या दोघांचे मृतदेह सापडले.

साजिद (वय ७) आणि मुस्कान (वय ५) हे दोघे भावंडं बुधवारी नेहमीप्रमाणे घराजवळ असलेल्या मैदानात खेळत होते. त्यानंतर दुपारी ते घरी परतले नाहीत तेव्हापासून ते बेपत्ता होते. संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने आई-वडिलांनी त्यांचा शोध सुरू केला. ब-याचवेळपर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते काही सापडले नाहीत. त्यानंतर वडिलांनी अ‍ॅन्टॉप हिल पोलिस ठाण्यात मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

पुन्हा एकदा कुटुंबीय आणि पोलिस त्यांचा शोध घेत असताना घराजवळील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या भंगारातील गाडीमध्ये हे दोघे सापडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोघांचा मत्यू गाडीमध्ये गुदमरल्याने झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने या चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती अ‍ॅन्टॉप हिल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान गरंडे यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR