38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयक्रिस्टिना पिस्कोव्हाने जिंकला २०२४ चा विश्व सुंदरी किताब

क्रिस्टिना पिस्कोव्हाने जिंकला २०२४ चा विश्व सुंदरी किताब

भारताच्या सिनीचे स्वप्न भंगले

मुंबई : चेक गणराज्याच्या क्रिस्टिना पिस्कोव्हाने ७१ वा ‘मिस वर्ल्ड’चा (विश्व सुंदरी) किताब पटकावला आहे. ९ मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विश्व सुंदरी सोहळ्याच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते, यात क्रिस्टीनाने विश्व सुंदरीचा किताब जिंकला आणि विजेतेपदाच्या मुकुटावर आपले नाव कोरले. यावर्षी १२० स्पर्धकांनी सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. क्रिस्टीनाने १२० स्पर्धकांना मागे टाकत मिस वर्ल्डचा किताब पटकावला. तर भारताच्या सिनी शेट्टीचे स्वप्न भंगले.

दरम्यान, या स्पर्धेत भारताकडून सिनी शेट्टी या सौंदर्यवतीचाही सहभाग होता. मात्र, विजेतेपदाच्या जवळ आल्यानंतर ती शर्यतीतून बाहेर पडली. ती टॉप-८ मध्ये स्थान मिळवण्यास यशस्वी झाली मात्र, टॉप-४ स्पर्धकांमध्ये तिला स्थान मिळवता आले नाही. सिनीचा जन्म कर्नाटकात झाला असून तिचे शिक्षण मुंबईत झाले. तिने २०२२ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावला आहे. काल झालेल्या या स्पर्धेत जगभरातील फॅशन उद्योगातील आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.

करण जोहरने केले सूत्रसंचालन
विश्व सुंदरी २०२४ च्या शानदार आयोजन सोहळ्यात भारताचा प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने उत्तमरीत्या सूत्रसंचालन केले. करण जोहरसोबत मिस वर्ल्ड २०१३ फिलिपिन्सची मेगन यंग. याशिवाय नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टोनीसह प्रसिद्ध गायक शाननेही आपल्या मधुर गाण्यांनी या कार्यक्रमात रंगत आणली. २८ वर्षांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याआधी १९९६ मध्ये बंगळुरू येथे ४६ व्या विश्व सुंदरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भारताला पहिला विश्व सुंदरी किताब कधी मिळाला?
साल २०१७ नंतर भारताच्या एकाही सौंदर्यवतीला
विश्व सुंदरी किताब मिळाला नाही. तर भारताला विश्व सुंदरीचा पहिला किताब रीटा फारिया पॉवेल या सौंदर्यवतीला १९६६ साली मिळाला होता. विश्व सुंदरीचा किताब मिळवणा-या त्या पहिल्या भारतीय होत्या. यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन १९९४, डायना हेडन १९९७, युक्ता मुखी १९९९, प्रियंका चोप्रा २०००, मानुषी छिल्लर हिला २०१७ साली हा किताब मिळाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR