40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाने रचला इतिहास, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १

टीम इंडियाने रचला इतिहास, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला आहे. या विजयाचा फायदा भारतीय संघाला आयसीसी कसोटीच्या क्रमवारीत झाला असून, भारत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर यापूर्वी भारतीय संघ टी-२० आणि वनडेमध्येही अव्वल होता. अशाप्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनला आहे.

यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्येही टीम इंडियाने अशीच कामगिरी केली होती आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनला होता. त्यावेळी, भारतीय संघ आधीच कसोटी आणि टी-२० मध्ये पहिल्या क्रमांकावर होता आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर, त्याने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही पहिले स्थान मिळवले होते.

मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत झाल्यानंतर भारताने कसोटीमधले पहिले स्थान गमावले आणि ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम क्रमांकावर आला. आता विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धर्मशाळा कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा कसोटीतील नंबर-१ टीम बनली आहे. यामुळे भारताने आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.

आयसीसीने दिली माहिती

आयसीसीने रविवारी सांगितले की, हैदराबादमधील पहिली कसोटी भारताने २८ धावांनी गमावली. मात्र यानंतर भारताने मालिकेत दमदार पुनरागमन केले आणि इंग्लंडविरुद्ध उर्वरित चार कसोटी सामने जिंकले. यामुळे भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचला आहे. कसोटी क्रमवारीत संघाचे आता १२२ गुण आहेत. ऑस्ट्रेलिया ११७ गुणांसह दुस-या स्थानावर आहे, तर इंग्लंड १११ गुणांसह तिस-या स्थानावर आहे. यासह वनडेमध्ये १२१ गुणांसह आणि टी-२० मध्ये २६६ गुणांसह भारत प्रथम क्रमांकावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR