30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रदारूच्या दुकानांनी केली भुमरेंची गोची

दारूच्या दुकानांनी केली भुमरेंची गोची

छ. संभाजीनगर : लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेले शपथपत्र विरोधकांच्या टीकेनंतर दोनच दिवसांत बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झालेल्या संदिपान भुमरे यांनी नऊ दारूची दुकाने सुरू केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने केला गेला.

याच आरोपांची री ओढत पक्षफुटीआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात येऊन दारू विकता. संत एकनाथ महाराजांना काय वाटेल, असा टोला लगावला होता. आता लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असताना याच दारूच्या दुकानांनी महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांची चांगलीच गोची केल्याचे दिसून येत आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी संदिपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात दिलेल्या माहितीचा आधार घेत दारूच्या दुकानांची माहिती का लपवली? असा सवाल करत भुमरे यांची कोंडी केली होती. त्यानंतर भुमरे यांनी दोन दिवसांत आपल्या शपथपत्रात बदल करत दोन दारूची दुकाने आपल्या पत्नीच्या नावावर असल्याचे नमूद केले.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी आणि पदाधिका-यांच्या उपस्थितीत भुमरे संभाजीनगरात मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या शक्तिप्रदर्शनानंतर पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करून महायुती महाविकास आघाडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आतापर्यंत खान पाहिजे की बाण? या मुद्याभोवती फिरत आलेला आहे.

शहराच्या नामांतराचा विषय आता निकाली निघाल्यामुळे सर्वसामान्यांच्या नियमित पाणी, रस्ते, वीज या मुद्यांना हात घालण्याऐवजी विरोधकाला नामोहरम करण्यासाठी वैयक्तिक पातळीवरील टीकेला महत्त्व दिले जात आहे. संदिपान भुमरे यांच्या दारूच्या दुकानांचा मुद्दा विरोधकांकडून प्रचारात प्रमुख असेल असे यावरून दिसते. संदिपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळवताना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली.

आधी ही जागा भाजपकडून सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भाजपच्या नेत्यांची मनधरणी करावी लागली. आता जागा मिळाल्यानंतर अपक्ष आणि बंडखोरांना कसेबसे रोखण्यात महायुतीला यश आले. मात्र संदिपान भुमरे यांनी सुरू केलेली दारूची दुकाने त्यांची पाठ काही सोडायला तयार नाहीत. विरोधकांनी याच मुद्यावरून भुमरेंना पाणी पाजण्याचे ठरवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR