35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रभिवंडीतील सपाचे नेते हातात घड्याळ बांधणार?

भिवंडीतील सपाचे नेते हातात घड्याळ बांधणार?

भिवंडी : मागील अनेक वर्षांपासून भिवंडीमध्ये समाजवादी पक्षाचे सायकल हे चिन्ह विविध निवडणुकीच्या मतपत्रिकेवर होते. मात्र, दोन दिवसांपासून समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेतृत्व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियासह टीव्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे भिवंडीतील लोकसभा निवडणुकीच्या मतपत्रिकेतून सायकल चिन्ह गायब होणार की काय? अशा चर्चांना उधाण आले आहे.

भिवंडीत मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने येथील मतदारांना आकर्षित करणारे काँग्रेस, समाजवादी आणि एमआयएम हे तीन पक्ष गुण्यागोविंदाने नांदत होते. त्यामुळे भिवंडी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत इतर राजकीय पक्षांसह पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकत होते. त्यापैकी समाजवादी पक्षाने नेहमी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. एकदा भिवंडी विधानसभा तर दोन वेळा भिवंडी पूर्व विधानसभा असे तीन वेळा समाजवादी पक्ष निवडून आला होता. तर भिवंडी महानगरपालिकेचे पहिले स्थायी समितीचे सभापती समाजवादी पक्षाचे होते.

मागील महानगरपालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी हे आजारी असल्याने सपाच्या अपेक्षित जागा निवडून आल्या नाहीत. पण आता समाजवादी पक्षाचे नेतृत्व करणारे अबू असीम आझमी आणि भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख हे प्रफुल्ल पटेलांबरोबर जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व स्वीकारत असतील तर समाजवादी पक्षाला कोण वाली राहील? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

याबाबत समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाझ आझमी यांच्याशी फोनवरून संपर्क होऊ शकला नाही. मात्र समाजवादी पक्षाचे प्रदेश महासचिव तथा भिवंडी मनपा नगरसेवक अजय यादव यांनी माझी अबू आझमी यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार नसल्याचे सांगितले असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR