33.2 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेच्या महायुतीत सहभागासाठी शिंदे, फडणवीस, राज ठाकरेंची मॅरेथॉन बैठक

मनसेच्या महायुतीत सहभागासाठी शिंदे, फडणवीस, राज ठाकरेंची मॅरेथॉन बैठक

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभेच्या निवडणुका घोषित होऊन पहिल्या टप्प्यात राज्यातील ५ मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तरी महाविकास आघाडी आणि महायुतीतीतील जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. अजूनही बैठकांचे सत्र सुरू आहे. मनसेला महायुतीत सामावून घेण्याचा निर्णय झाला असला तरी याची औपचारिक घोषणा अजूनही झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज एका पंचतारांकित हॉटेलात प्रदीर्घ चर्चा झाली. बुधवारी मध्यरात्रीदेखील फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक पार पडली. अशा भेटी होतच असतात, असे सांगत फडणवीस यांनी अधिक बोलायचे टाळले; पण मनसेला नाशिकची जागा सोडण्यास शिंदे तयार नसल्याने कोंडी झाल्याची कुजबूज आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या तिघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. भाजपाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केल्यानंतरही महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच मनसेच्या सहभागामुळे हा तिढा आणखी वाढला आहे. मनसेची २ ते ३ जागांची मागणी आहे त्यामुळे या जागांसाठी महायुतीतील कोणत्या पक्षाने त्याग करायचा, यावर तिघांमध्ये चर्चा झाली. राज ठाकरे यांना शिंदे गट आणि भाजपाच्या कोट्यातील जागा दिली जाऊ शकते. दक्षिण मुंबई आणि नाशिक या दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या त्यामुळे त्यापैकी दक्षिण मुंबई आम्ही सोडण्यास तयार आहोत. नाशिक मागू नका, अशी शिवसेनेची भूमिका आहे. यावर आज बराच खल झाल्याचे समजते.

दरम्यान, या भेटीबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू असून योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असे सांगितले तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना अशा भेटी होतच असतात, असे सांगून आजच्या बैठकीबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले. महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच महिन्यापासून बैठका सुरू आहेत मात्र त्यांचा निर्णय झालेला नाही. आम्ही एकाच बैठकीत ८० टक्के जागांबाबत निर्णय केला आहे. दुस-या बैठकीत २० टक्के जागांबाबत निर्णय करू, असेही फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR