35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगजगभरातील मध्यवर्ती बॅँकांच्या खरेदीमुळे सोने वधारले!

जगभरातील मध्यवर्ती बॅँकांच्या खरेदीमुळे सोने वधारले!

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात आरबीआयची खरेदी २० महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर गेली. तर गेल्या दोन महिन्यांत आरबीआयने सोने खरेदी करणे टाळले आहे.

सोन्याच्या किंमती वाढण्यात मध्यवर्ती बँकांकडून खरेदीचा मोठा वाटा आहे. सोन्याच्या भावात सध्या विक्रमी वाढ होत आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याने ६६ हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. आंतरराष्ट्रीय किंमती २,२०० डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी २०२४ मध्ये जगभरातील केंद्रीय बँकांकडून ३९ टन सोन्याची निव्वळ खरेदी करण्यात आली. मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झालेला हा सलग ८ वा महिना आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी डिसेंबर २०२३ मध्ये एकूण १७ टन सोने खरेदी केले होते.

अहवालानुसार, जानेवारी २०२४ मध्ये सर्वाधिक खरेदी सेंट्रल बँक ऑफ तुर्कीने केली होती. तुर्कस्तानच्या सेंट्रल बँकेने या काळात सोन्याचा साठा १२ टनांनी वाढवला. ऑक्टोबरच्या अखेरीस तुर्कीचा सोन्याचा साठा ५५२ टनांपर्यंत वाढला. फेब्रुवारी २०२३ मध्ये तुर्कीचा सोन्याचा साठा ५८७ टन इतका विक्रमी उच्चांकावर होता.

चीनची मध्यवर्ती बँक पीपल्स बँक ऑफ चायना दुस-या स्थानावर आहे. जानेवारी २०२४ मध्ये सेंट्रल बँक ऑफ चायनाने १० टन सोने खरेदी केले होते. चीनचा सोन्याचा साठा जानेवारी २०२४ अखेर २,२४५ टन झाला. ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत हे अंदाजे ३०० टन अधिक आहे.

भारताची रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडिया जानेवारी २०२४ मधील सुमारे ९ टन सोन्याच्या खरेदीसह तिस-या स्थानावर आहे. भारताचा सोन्याचा साठा आता ८१२ टन झाला आहे. ऑक्टोबर २०२३ नंतर प्रथमच आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. तसेच, जुलै २०२२ नंतर आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

कझाकस्तान, जॉर्डन आणि झेक प्रजासत्ताकच्या केंद्रीय बँका जानेवारी २०२४ मध्ये सोने खरेदीच्या बाबतीत अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर होत्या. कझाकिस्तान, जॉर्डन आणि झेक प्रजासत्ताकच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या सोन्याच्या साठ्यात अनुक्रमे ६ टन, ३ टन आणि २ टन वाढ केली.

बँका सोने खरेदी का करत आहेत?
डॉलरच्या घसरत्या क्रयशक्तीपासून संरक्षण करण्यासाठी सोने हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. चलन आणि अर्थव्यवस्था धोक्यात असतानाही मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात.

अमेरिका, चीन आणि युरोपातील अनेक देशांमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. विशेषत: चीन आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांना तोंड देत आहे. चीनची अर्थव्यवस्था बुडाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR