38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयअन्सारींच्या मृत्यूमुळे खळबळ , विषप्रयोगाच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी

अन्सारींच्या मृत्यूमुळे खळबळ , विषप्रयोगाच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी

नवी दिल्ली : बांदा तुरुंगात बंद असलेले उत्तर प्रदेशचे बाहुबली नेता आणि डॉन मुख्तार अन्सारी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यामुळे राजकीय खळबळ उडाली असून, मायावतींसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्तार अन्सारी यांच्या मृत्यूवर प्रश्न निर्माण करून घातपात झाल्याचा आरोप करत, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. बांदा मेडिकल कॉलेजने अन्सारी यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. यामुळे पोलिस प्रशासनाने संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे. तर मऊ, गाझीपूर आणि बांदा जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी तुरुंगात मुख्तार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांचा भाऊ अफजल आणि मुलगा उमर अब्बास यांनी मुख्तार यांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली होती आणि कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अफझलने आपल्या भावाला तुरुंगात विष दिले जात असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्तार यांचा मृत्यू खेदजनक असल्याचे म्हटले असून, त्यांच्या भावाने केलेल्या आरोपाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ६३ वर्षीय अन्सारी हे पाच वेळा मऊ सदरमधून आमदार राहिले आहेत. त्यांच्यावर ६० हून अधिक गुन्हे प्रलंबित असून, ते २००५ पासून तुरुंगात होते.

अन्सारी यांच्या मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप आणि योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक ठिकाणी एखाद्याच्या जीवाचे रक्षण करणे हे सरकारचे पहिले कर्तव्य आहे. मुख्तार अन्सारी यांच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांकडून केलेल्या गंभीर आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. अशा स्थितीत त्याच्या कुटुंबीयांना दु:ख होणे स्वाभाविक आहे. निसर्ग त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे मायावती म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR