35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeराष्ट्रीयमोदींच्या काळात गरीबांच्या संपत्तीची लूट

मोदींच्या काळात गरीबांच्या संपत्तीची लूट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात केवळ गरीबांच्या संपत्तीची लूट करून ती काही उद्योजकांच्या घशात घातल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला. दिल्लीतील जवाहर भवनात समृद्ध भारत या संघटनेतर्फे सामाजिक न्याय संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाच्या उदघाटनाच्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर आर्थिक व सामाजिक धोरणांवर पुन्हा हल्ला चढविला. यावेळी प्रसिद्ध लेखक व दलित विचारवंत कांचा इलय्या उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, भारत विश्वगुरू होणार असल्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी लोकांना दाखवित आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी आधी या देशातील सामान्य माणसांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. दोन-चार उद्योजकांची संपत्तीत वाढ झाल्याने देश विश्वगुरु होणार नाही. या देशाची प्रगती सामान्य शेतकरी, शेतमजूर, छोटे उद्योजक, व्यापारी, कष्टक-यांच्या श्रमातून झालेली आहे. शेतकर्यांच्या जमिनी मोठ्या प्रकल्पांना मिळाल्या, मोठ्या विद्यापीठांना मिळाल्या, मोठ्या दवाखान्यांना मिळाल्या. विकास श्रीमंतांचा झाला. गरीब शेतक-यांच्या जमिनीवर हा विकास झाला आहे. या विकासाच्या मुळाशी असलेला शेतकरी आज कुठे आहे. त्यांचा या धोरणात काय सहभाग आहे असा सवाल त्यांनी केला.

निवडणुकीसाठीचा हा लढा नव्हे
शेतकरी, शेतमजूर, वंचितांसाठी सुरू केलेला लढा हा निवडणुकीसाठी नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, निवडणुकीचा निकाल काय लागतो, याच्याशी माझे काहीही देणेघेणे नाही. माझ्या विचाराचा केंद्रबिंदू हा समाजातील सर्वांत शेवटचा माणूस आहे. या माणसाला न्याय देईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी या वर्गाची लढाई लढणार आहे. यासाठी जातीगणनेची मागणी करीत आहे. इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास पहिला निर्णय हा जातीगणनेचा होईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR