30.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeराष्ट्रीयविद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत लिहिले जय श्री राम; शिक्षकाने सगळ्यांना करुन टाकले पास

विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत लिहिले जय श्री राम; शिक्षकाने सगळ्यांना करुन टाकले पास

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील पूर्वांचल विद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील चार विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरांऐवजी ‘जय श्री राम’ आणि काही क्रिकेटपटूंची नावे लिहिली होती. या चार विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५६ टक्के मार्क देण्यात आल्याचे समोर आले आहे.

वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यालयातील एका माजी विद्यार्थ्याने माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. विद्यालयातील डी-फार्माच्या पहिल्या आणि दुस-या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तर लिहिण्याऐवजी जय श्री राम आणि काही क्रिकेटपटूंची नावे लिहिली होती. अशा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन शिक्षक डॉ. विनय वर्मा आणि डॉ. आशुतोष गुप्ता यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

माजी विद्यार्थ्याला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांमधून धक्कादायक माहिती समोर आली. चार विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकांवर ‘जय श्रीराम, पास हो जाएं’ आणि विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या अशी काही क्रिकेटपटूंची नावे लिहिण्यात आली होती. असे असताना विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ७५ पैकी ४२ मार्क दिले, म्हणजे त्यांना ५६ टक्के मार्ग देऊन उत्तीर्ण करण्यात आले.

माजी विद्यार्थी दिव्यांशु याने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये म्हणण्यात आले होते की, शिक्षकांनी पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. याप्रकरणी २१ डिसेंबर २०२३ रोजी तपास करुन कारवाईचे आदेश देण्यात आले होते. विद्यालयाने एक कमिटी स्थापन केली होती. तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली. तपासामध्ये दोन शिक्षक दोषी आढळून आले.

समितीने उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी बाहेरच्या शिक्षकांना दिल्या. त्यात विद्यार्थ्यांना शून्य मार्क मिळाले आहेत. कारण, त्यांनी एकाचेही उत्तर लिहिले नव्हते. त्यामुळे माजी विद्यार्थ्याने केलेला दावा खरा ठरला आहे. याप्रकरणी शिक्षकांवर कागदी कारवाई करण्यात आलेली आहे. पण, अद्याप कठोर कारवाई करण्यात आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR