29.3 C
Latur
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमतदान कर्मचारी केंद्र बंद करून पंगतीत जेवायला बसले; मतदार ताटकाळत बसले

मतदान कर्मचारी केंद्र बंद करून पंगतीत जेवायला बसले; मतदार ताटकाळत बसले

यवतमाळ : बँक कर्मचा-यांचे लंच ब्रेकचे अनेक किस्से तुम्ही-आम्ही नेहमीच ऐकतो, अनुभवतो. आज लोकसभा निवडणुकाच्या राज्यातील दुस-या टप्प्यातील मतदान होत आहे. बँकेसारखाच किस्सा राज्यातील एका मतदारसंघात घडला आहे. मतदान केंद्र बंद ठेवण्याची परवानगी नसताना कर्मचा-यांनी तब्बल २५ मिनिटांचे लंच ब्रेक घेत मतदारांना बाहेर ताटकळत ठेवल्याचा प्रकार घडला आहे.

यवतमाळ मतदारसंघातील हिवरी येथील मतदान केंद्रात हा प्रकार घडला आहे. कर्मचारीही माणूसच आहेत. त्यांनाही तहाण, भूक असते. परंतु, मतदान केंद्राचा दरवाजा बंद करून उन्हा तान्हात उभ्या असलेल्या मतदारांना बाहेर ताटकळत ठेवत आतमध्ये चार-पाच जण पंगतीला बसून गप्पा मारत जेवत असतील तर काय? असा सवाल विचारला जात आहे.

मतदान प्रक्रिया ही सकाळी सात वाजता सुरु झाली होती. ती अखंड दिवसभर सुरु ठेवायची असते. एका केंद्रावर चार ते पाच कर्मचारी दिलेले असतात. त्यांनी आलटून पालटून जेवण, नाष्टा करायचा असतो. परंतु मतदान बंद करायचे नसते. या नियमाला या कर्मचा-यांनी हरताळ फासत आतमध्ये पंगत मांडल्याचा प्रकार घडला आहे.

याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी या कर्मचा-यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मतदार वेळात वेळ काढून मतदान केंद्रांवर दाखल होत असतात. यवतमाळच्या हिवरी येथील मतदान केंद्रावर चक्क दुपारच्या जेवणासाठी कर्मचा-यांनी मतदान केंद्र बंद ठेवून पंगतीत बसून जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी पाच ते दहा मिनिटे मतदान बंद केलेले असा दावा केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR