36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणी८३ लाखांच्या थकीत पाणीपट्टीमुळे सेलूकरांना ४ दिवसांपासून निर्जळी

८३ लाखांच्या थकीत पाणीपट्टीमुळे सेलूकरांना ४ दिवसांपासून निर्जळी

सेलू/प्रतिनिधी
पाटबंधारे अर्थात जलसंपदा खात्याचे पाणीपट्टीचे ८३ लाख सेलू नगर परिषदेकडे थकबाकी असल्या कारणाने निम्न दुधना प्रकल्पाच्या अधिका-यांनी दि.८ मार्च पासून निम्न दुधना प्रकल्पातून सेलू शहराला होणारा पाणी पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या प्रारंभीच सेलूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. थकबाकी रकमेच्या कमीत कमी अर्धी रक्कम भरल्यासच पाणी पुरवठा पुर्ववत सुरू केला जाईल असे निम्न दुधना प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता यांनी सांगितले आहे. त्यामुळे थकीत रक्कम भरेपर्यंत सेलूकरांना मात्र निर्जळीचा सामना करण्याची वेळ येणार आहे.

सेलू आणि परिसरात यावर्षी पाऊस न पडल्यामुळे शासनाने सेलू तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे. त्यात सेलू नगर परिषदेकडे ८३ लक्ष रुपयाची जलसंपदा खात्याची पाणीपट्टी थकीत असल्यामुळे सेलूला होणारा पाणीपुरवठा निम्न दुधना प्रकल्पातून बंद केला आहे. अगोदरच पाऊस कमी असल्यामुळे प्रकल्पातच पाणीसाठा अगदीच कमी आहे. त्यात या पाणी साठ्यापैकी पिण्याकरिता राखीव पाणीसाठा ठेवण्याकरिता जलसंपदा खात्याने सेलू नगर परिषदेला अनेक वेळा कळवले असल्याचे संबंधित अधिका-यांनी सांगितले मात्र याकडे सेलू नगर परिषदेचे दुर्लक्ष झाल्यामुळे सेलू नगर परिषदेकडे मूळ पाणीपट्टीची जवळपास १८ लाखाची थकबाकी होती. त्यापैकी मागील महिन्यात जवळपास ११ लाख रुपये पाणीपट्टी पोटी जलसंपदा खात्याकडे भरलेले होते. उर्वरित सात लाख रुपये मार्च महिन्यात भरावयाचे होते. मात्र जलसंपदा खात्याने वेळीच राखीव पाणी साठ्याबाबत न कळवल्यामुळे जवळपास ६१.९७ लाख रुपयाचा उदंड लावत एकूण ८३ लाखाची थकबाकी काढल्यामुळे व नगरपरिषदेने ती न भरल्यामुळे दि.८ मार्च पासून जलसंपदा खात्याने निम्न दुधना होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या प्रारंभीच सेलूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सध्या सेलू नगर परिषदेकडे ७ लाख रुपयाची पाणीपट्टी थकीत आहे. मात्र दंडाची रक्कमच ६० लाखापेक्षा जास्त असल्यामुळे आता ती भरणे गरजेचे आहे. त्याकरिता आता सेलू नगरपरिषद धावपळ करत आहे. एवढे मात्र खरे की गेल्या चार दिवसापासून सेलूकरांना होणारा पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे सेलूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. धरण उशाला अन कोरड सेलू ला अशी स्थिती निर्माण झाली आहे. निम्न दुधना प्रकल्पातून सेलू शहराला पाणीपुरवठा केला जातो. हे धरण सेलू तालुक्यात असून देखील सेलूकरांच्या घशाला कोरड पडू पाहत आहे.

याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्याशी संपर्क केला असता ८० लाखाची वसुली असल्याचे त्यांनीही मान्य केले. मात्र त्यापैकी किमान अर्धी रक्कम तरी भरावी लागेल तरच पाणीपुरवठा सुरू होईल असे ते म्हणाले. त्यामुळे मुख्याधिकारी व नगरपरिषदेच्या वतीने निम्न दुधना प्रकल्पातील पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू करण्याकरिता प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. मात्र पाणीपुरवठा केव्हा सुरू होईल हे कळू शकले नाही. जलसंपदा अर्थात निम्न दुधना प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता यांच्याशी संपर्क केला असता ८३ लक्ष रुपयांपैकी कमीत कमी अर्धी अधिक रक्कम तरी भरावी लागेल तरच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाऊ शकतो असे म्हणाले. त्यामुळे थकीत पाणीपट्टी कधी भरली जाते व कधी या निर्जळीतून सुटका होते याकडे सूलकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR