38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeधाराशिवधाराशिव जिल्ह्यात यंदा ४.४० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणीचा अंदाज

धाराशिव जिल्ह्यात यंदा ४.४० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणीचा अंदाज

धाराशिव : प्रतिनिधी
जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ५ लाख ६० हजार हेक्टर असून खरिप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पिक आहे. यंदा सर्वाधिक ४ लाख ४० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज आहे. दिवसेंदिवस खरिप हंगामात रासायनिक खतांचा वापर वाढला असल्याने कृषी विभागाच्या वतीने ९८ हजार ३०३ मेट्रीक टन खताची मागणी कृषी आयुक्त स्तरावर करण्यात आली आहे. मंगळवारी दि. २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरिय खरिप हंगामपूर्व व कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक झाली.

या बैठकीला जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी विकास अधिकारी, जिल्हा मार्केटींग अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महाबीज प्रतिनिधी, कृषी विक्रेते, खत पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरिक्षक आदी उपस्थित होते. जिल्ह्यात २०२३ मधील खरिपाचे क्षेत्र ५ लाख ६० हजार हेक्टर होते. त्यापैकी सोयाबीन पिकाखालील क्षेत्र ४ लाख ७८ हजार हेक्टर होते. पेरणीच्या एकूण क्षेत्राच्या ६९ टक्के प्रमाण सोयाबीन पिकाचे आहे. यंदाच्या खरिप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र ४ लाख ४० हजार हेक्टर प्रस्तावित आहे.

हवामान खात्याने वेळेवर व चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने मूग व उडीदाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात अनाधिकृत बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके यांची विक्री होत असल्यास संबंधितांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर वाढल्याने यंदा ९८ हजार ३०३ मेट्रीक टन खताची मागणी कृषी आयुक्तावकडे नोंदविली असल्याचे बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सांगितले.

यंदाच्या खरिप हंगामासाठी नॅनो युरिया व नॅनो डिएपी खताचे आवंटन मंजूर आहे. शंभर टक्के खताची विक्री ई-पॉस मशीनद्वारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तर व तालुका स्तरावर भरारी पथकामार्फत व गुण नियंत्रण निरिक्षक मार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR