34.1 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रजागावाटप झाले, सांगलीची जबाबदारी त्या पक्षाची..

जागावाटप झाले, सांगलीची जबाबदारी त्या पक्षाची..

बंडखोरीवर उद्धव ठाकरे यांचे रोखठोक मत

मुंबई : महाविकास आघाडीने राज्यातील जागावाटप जाहीर केले आहे. या जागावाटपानंतर काही ठिकाणी बंडखोरी होत आहे. सांगलीत काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. त्यावर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे. सांगलीची जबाबदारी काँग्रेसची आहे. त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी रोखावी. ज्या, ज्या ठिकाणी अशी बंडखोरी होणार आहे, त्या त्या ठिकाणी त्या, त्या पक्षाला बंडखोरी रोखावी लागणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सर्व ४८ जागा जिंकणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

ठाकरे गटाचे मशाल गीत मंगळवारी लॉन्च करण्यात आले. तसेच नवीन चिन्ह जनसमान्यात नेण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात भाजपची ४५ प्लसची घोषणा आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचा ४५ प्लस हा आकडा महाराष्ट्रातील नाही तर देशभरातील आहे. जनतेमध्ये भाजपच्या हुकूमशाहीविरोधात प्रचंड रोष आहे. हा रोष मतपेटीतून व्यक्त होणार आहे. भाजपचा राज्यात पूर्ण पराभव होणार आहे. विनोद घोसाळकर कुठेही जाणार नाहीत, ते या ठिकाणीच बसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

संयुक्त वचननामा येणार
महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा लवकरच येणार आहे. काँग्रेसने देशभरासाठी जाहीरनामा जाहीर केला आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे. त्यात काही गोष्टी अजून टाकायच्या असतील तर आम्ही टाकू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा लवकरच होणार आहेत. त्यासाठी जाहिराती तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम समाजाला प्राधान्य देणारा आहे, अशी टीका भाजपकडून होत आहे. त्यावर स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिले. ते म्हणाले, मुस्लिम लीगचा अनुभव भाजपाला जास्त आहे. कारण जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १९४०-४२ मध्ये पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन केले होते. त्यामुळे त्यांचे ते जुने नाते आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR