40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeधाराशिवकष्टक-यांचा शेतकरी कामगार पक्ष गेला कुणीकडे?

कष्टक-यांचा शेतकरी कामगार पक्ष गेला कुणीकडे?

कळंब : सतीश टोणगे
शेतकरी कष्टकरी सर्वसामान्यांसाठी सतत वाचा फोडणारा हक्काचा शेतकरी कामगार पक्ष आज कुठे दिसत नाही. शेकाप गेला कुणीकडे…. अशी चर्चा आता होऊ लागली आहे. खरं तर याच पक्षाने हजारो कार्यकर्ते, नेते तयार केले. शेतक-यांच्या विविध प्रश्नांचा आवाज बुलंद केला.या पक्षाच्या आंदोलनाला एकेकाळी सरकार घाबरत असे.शेतक-यांना व त्यांच्या मालाला ख-या अर्थाने प्रतिष्ठा मिळावी, यासाठी शेतकरी नेते स्व.शरद जोशी पासून आतापर्यंत अनेकांनी आंदोलने केली त्या तून नेते तयार झाले.

धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री पदाची खुर्चीला लाथ मारणारे भाई उद्धवराव पाटील, मा. आ. माणिकराव खपले ,मा. आ. कुंडलिकराव घोडके, अच्युतराव कवडे , नरसिंगराव देशमुख या तत्त्वनिष्ठ नेत्यांनी प्रतिनिधित केले होते. त्यानंतर मात्र या जिल्ह्यातील शेतक-यांच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या शेकापला घरघर लागली. याचे आत्मपरीक्षन आताच्या नेत्यांनी करणे गरजेचे आहे. शेकापने खासदार, आमदार, बँकेचे चेअरमन, संचालक, जि .प .पंचायत समितीचे पदाधिकारी तयार केले ते नंतर इतर पक्षाकडे झुकले गेले. त्यामुळे नंतर कार्यकर्ते तयार होऊ शकले नाहीत. राज्यात एन.डी. पाटील स्व. गणपतराव देशमुख, जयंतराव पाटील आदी दिग्गज नेत्यांनी लक्ष दिले नसल्याचे जुने कार्यकर्ते सांगतात. लोकसभेच्या निवडणुकीतही शेकाप ला बेदखल केल्याचे चित्र आहे.

लाल टोप्या, लाल झेंडे, घेऊन हजारो कार्यकर्ते शेतकरी आंदोलन करायचे, पण आज ते चित्र राहिले नाही. शेतक-यांच्या प्रश्नावर लढणारा एकमेव पक्ष होता. आजही प्रत्येक गावात शेतकरी कामगार पक्षाचे, विचारांचे कार्यकर्ते आहेत. पण त्यांचे संघटन होत नसल्याने व वरिष्ठ मंडळी लक्ष देत नसल्याने त्यांचा प्रभाव जाणवत नाही. या जिल्ह्यात शे.का.प .च्या ताब्यात साखर कारखाना होता, त्या तून ही पक्षाला बळ मिळाले नाही, तोही आता सेनेच्या नेत्याकडे दिला आहे. याच तालुक्यातील स्व. भाई नामदेवराव पाटील, ज्ञानेश्वर काळे, बाबुराव जाधव यांनी कधीही तडजोड केली नाही. शेतकरी कामगार पक्षाची निशाणी असलेली लाल टोपी शेवट पर्यंत उतरवली नाही.

या जिल्ह्यात आता भाई धनंजय पाटील, अविनाश देशमुख, अमोल देशमुख, बाळासाहेब धस, सुरेश होके, शाहूराव डोंगरे मनोहर भाकरे, गोपीचंद फावडे यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींमुळे हा पक्ष तग धरून आहे. हा पक्ष वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. शेतकरी तरुणांना आकर्षित करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. तरच हा पक्ष पुढे जाईल. नेमका शेतकरी कामगार पक्षाला का ग्रहण लागले,हा पक्ष संपवण्याचा घाट कुणी घातला, या पक्षाची नेमकी अडचण कुणाला व का ठरली गेली……आणि मग शे.का.प. गेला कुणी कडे…..याचे उत्तर मिळेल. या पक्षाच्या झेंड्याखाली अनेक जण कोट्याधीश झाले, शेतक-यांचे कामे करत करत स्वत: श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसणा-या नेत्यांनी कधीतरी मागे वळून पाहिले पाहिजे होते.

या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला का टाळले जात आहे, या पक्षाची मते निर्णयक ठरू शकतात हे मात्र उमेदवारानी लक्षात ठेवले पाहिजे. नेते कोणत्याही पक्षाकडे गेले असेल तरी मतदार मात्र आहे, तिथेच आहे. त्यामुळे मतदार हा मनाचा मालक आहे. त्याच्या मनात येईल तोच करणार आहे शेतकरी कामगार पक्षाने पुन्हा बांधणी करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ मंडळी करताना दिसत आहेत.यात तरुण शेतक-यांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR