34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeपरभणी२१ लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान

२१ लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान

उमेदवारांची होणार दमछाक, २६ एप्रिल रोजी मतदान परभणी लोकसभा मतदार संघ

परभणी : सुधीर गो. बोर्डे
परभणी लोकसभा निवडणुकीसाठी दि. २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. परभणी लोकसभा मतदार संघात परभणी, पाथरी, ंिजतूर, गंगाखेड, परतूर आणि घनसावंगी हे ६ विधानसभा मतदार संघ आहेत. परभणी व जालना अशा दोन जिल्ह्यात विभागलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात १ हजार ३०० गावांचा समावेश आहे. परभणी लोकसभा मतदार संघात एकुण २१ लाख १२ हजार २७२ मतदार असून एकुण २२८७ मतदान केंद्राची संख्या आहे. निवडणुकीला अवघे ५ दिवस उरले असून प्रत्येक गावातील मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान उमेदवारांपुढे उभा असून प्रचार करताना दमछाक होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यासह सोशल मिडीयाच्या माध्यमातून उमेदवारांना आपली प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे.

परभणी लोकसभा मतदार संघ हा परभणी व जालना अशा दोन जिल्ह्यात विभागला असून एकुण १ हजार ३०० गावांचा समावेश आहे. त्यामुळे सहा विधानसभा मतदार संघातील १ हजार ३०० गावातील उमेदवारांपुढे पोहचण्याचे सर्वच उमेदवारांपुढे सुरूवातीपासून आव्हान आहे. आता निवडणुकीला अवघा ५ दिवसांचा कलावधी उरला असून दुसरीकडे जिल्ह्यातील उन्हाचा पारा ४१ अंशापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घामाच्या धारा वाहणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी उबाठाचे खा. संजय जाधव यांची निवडणूक निशाणी ‘मशाल’ आहे तर महायुतीचे उमेदवार व रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची निवडणूक निशाणी ‘शिट्टी’ आहे. दोन्ही उमेदवारांचे चिन्ह नवीनच आहे. आतापर्यंत मतदारांना ओळख झालेले धनुष्यबाण व घड्याळ हे चिन्ह या निवडणुकीत दिसणार नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नवीन चिन्हाबाबत गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांपुढे प्रचार करत असताना निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवण्याचे देखील आव्हान असणार आहे.

प्रचारासाठी उरले ५ दिवस
परभणी लोकसभेसाठी दि.२६ एप्रिलला मतदान होणार असून प्रचारासाठी अवघे ५ दिवस उरले आहेत. या ५ दिवसांच्या कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना सोशल मिडीयाची मोठी मदत होणार असून आता त्यांची दारोमदार सोशल मिडीयावरच अवलंबून असणार आहे. परभणी लोकसभा मतदार संघ अतिशय मोठा असल्याने सर्वच गावातील मतदारांपर्यंत पोहचणे शक्य होणार नसल्यामुळे उमेदवारांच्या प्रचाराची मोठी दारोमदार पदाधिकारी व कार्यकर्त्यावर अवलंबून असणार आहे.

पाराही चढला
एकंदरच परभणी लोकसभेतील ११ लाख ७३० पुरूष आणि १० लाख १५ हजार ९४९ महिला मतदार अशा एकुण २१ लाखांवर मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस उन्हाचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकत असल्याने प्रचार यंत्रणा राबवत असताना उमेदवारांची दमछाक होताना दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR