34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeधाराशिवधाराशिवमध्ये आता सास-यानंतर सुनेचे दिवस

धाराशिवमध्ये आता सास-यानंतर सुनेचे दिवस

अर्चनाताई पाटील यांचा अर्ज दाखल उपमुख्यमंत्री पवार यांचे धडाकेबाज भाषण

धाराशिव : सुभाष कदम
चार दिवस सासुचे…चार दिवस सुनेचे…या म्हणीचे उदाहरण देत धाराशिवमध्ये आता सुनेचे दिवस आले आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. राज्याचे माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना धाराशिवच्या जनतेने खासदार म्हणून निवडून दिले, आता त्यांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील यांना खासदार म्हणून निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी दि. १९ एप्रिल रोजी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तीप्रदर्शन करीत दाखल करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर जाहीर सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाकेबाज भाषण करीत धाराशिवकरांची मने जिंकली. यावेळी शिवसेना नेते तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, औशाचे भाजप आ. अभिमन्यू पवार, बार्शीचे आ. राजेंद्र राऊत, तुळजापुरचे भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील, उमरग्याचे शिवसेना आ. ज्ञानराज चौगुले, शिक्षक आ. विक्रम काळे, पदवीधर आ. सतीश चव्हाण, माजी आ. पाशा पटेल, माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्यासह शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं(आठवले), आदी महायुतीमधील घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धाराशिव तालुक्यातील तेर गाव ही सासुरवाडी आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या लहान भगिनी आहेत. अजित पवार हे डॉ. पाटील यांचे मेहुणे आहेत. भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना महायुतीची उमेदवारी दिली आहे. ते अर्चनाताईंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धाराशिवमध्ये आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी माझ्या सासुरवाडी धाराशिवला अनेकवेळा आलो, पण अशी अलोट गर्दी पहिल्यांदाच पाहतोय. ही निवडणूक गावकी, भावकीची नाही, लोकसभेची निवडणूक आहे. जगामध्ये भारताचा नावलौकीक वाढविण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यांना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

चार दिवस सासुचे असतात, तसे चार दिवस सुनेचेही येतात. अर्चनाताईंचे सासरे डॉ. पद्मसिंह पाटील यांना तुम्ही खासदार केले, आता त्यांच्या सुनबाई अर्चनाताईंना खासदार करा. माजीमंत्री डॉ. पाटील यांनी सलग ४० वर्षे राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खात्याचे मंत्री म्हणून काम केले. ते वयोमानानुसार आता सक्रीय राजकारणापासून अलिप्त झाले आहेत. त्यांचे चिरंजीव आ. राणाजगजितसिंह पाटील भाजपाचे आमदार आहेत. सुनबाई अर्चनाताईंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता खरोखरच सास-यानंतर सुनेचे दिवस आल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR