34.1 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाकोलकाताचा विजयरथ रोखला

कोलकाताचा विजयरथ रोखला

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सने सलग दोन पराभवानंतर आयपीएल २०२४ मध्ये अखेर तिसरा विजय नोंदवला. कोलकाता नाईट रायडर्सचा विजयरथ त्यांनी रोखला. चेपॉकवरील सामन्यात सीएसकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि त्यामुळेच स्फोटक फलंदाजांची फळी असलेल्या केकेआरला जखडून ठेवले. विजयी चौकार मारून पॉंईट टेबलमध्ये अव्वल स्थानी सरकण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या केकेआरला तीन सामन्यानंतर पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

सीएसकेच्या गोलंदाजांनी आज कमाल केली. रवींद्र जडेजा व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेताना केकेआरच्या स्फोटक फलंदाजांना शांत ठेवले. तुषारने पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला बाद केले. त्यानंतर जडेजाने ८ चेंडूंत ३ विकेट्स घेऊन सामनाच पलटला. केकेआरकडून अंगकृष रघुवंशी ( २४), सुनील नरीन ( २७) व कर्णधार श्रेयस अय्यर ( ३४) यांनी चांगला खेळ केला. पण, त्यांना मोठी खेळी करण्यापासून चेन्नईच्या गोलंदाजांनी रोखले. रवींद्र जडेजाने ४-०-१८-३ व तुषारने ४-०-३३-३ अशी स्पेल टाकली. मुस्ताफिजूर रहमानने दोन विकेट्स घेतल्या. केकेआरला २० षटकांत ९ बाद १३७ धावाच करता आल्या.

रचीन रविंद्र्र व ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सुरुवात करून देताना २७ धावा जोडल्या. वैभव अरोराने केकेआरला पहिले यश मिळवून देताना रविंद्र्रला ( १५) माघारी पाठवले. पण, कर्णधार ऋतुराज व डॅरील मिचेल मैदानावर उभे राहिले आणि दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. ऋतुराजने ४५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून हे त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले आणि मागील ५ वर्षांत सीएसकेच्या कर्णधाराकडून झालेले हे पहिलेच अर्धशतक आहे. ऋतुराज व मिचेल यांनी ५५ चेंडूंत ७० धावा जोडल्या. सुनील नरीनने ही जोडी तोडताना मिचेलला ( २५) त्रिफळाचीत केले.

इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शिवम दुबेने ताबडतोड फटकेबाजी केली. ऋतुराज ५८ चेंडूंत ९ चौकारांसह ६७ धावांवर नाबाद राहिला. शिवमने १८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २८ धावांवर त्रिफळाचीत झाला. विजयासाठी ३ धावा हव्या असताना महेंद्रंिसग धोनी आला अन् स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. चेन्नईने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि गुणतालिकेत ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. नेट रन रेटच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्स तिसरे राहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR