मुंबई (प्रतिनिधी) : आमच्या उमेदवारांच्या समोरचे बटन दाबा आणि निधी घ्या… हे अर्थमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे असून या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली. याबाबत ते निवडणूक आयोगाकडे तक्रारही करणार आहेत.
अजित पवार यांनी बुधवारी इंदापूर येथे जाहीर सभेत बोलताना, आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणारी नाही मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यानंतर आमच्या उमेदवारासमोरचे बटन कचाकचा दाबा आणि निधी घ्या, असे आवाहन मतदारांना केले होते. पवारांच्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, निवडणूक आयोगाचे फक्त विरोधी पक्षांकडे लक्ष आहे.
बटन दाबा आणि निधी घ्या, हा धंदा आहे काय? हीच गोष्ट विरोधी पक्षांच्या लोकांनी केली असती तर निवडणूक आयोगाने आतापर्यंत गुन्हा दाखल केला असता. पवारांचे वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे आहे; पण निवडणूक आयोग झोपला आहे का? असा सवाल करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. याबाबत आम्ही रितसर तक्रार करणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले.
















