38.9 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंची अवस्था चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी

एकनाथ शिंदेंची अवस्था चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चक्रव्युहात अडकावले आहे. त्यांचा अभिमन्यू झाला असून भाजपाच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत, अशी जळजळीत टीका शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश नवले यांनी आज केली. ज्या प्रमाणे शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आलेल्या खासदारांचे पत्ते कापले गेले त्याचप्रमाणे विधानसभेच्या वेळी कुठल्या तरी अहवालाचे दाखले देऊन शिवसेनेच्या आमदारांना उमेदवारी नाकारली जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

सर्वेक्षणाचे अहवाल चांगले नाहीत, असे सांगून भाजपाने शिवसेनेच्या काही जागा काढून घेतल्या, काही ठिकाणचे उमेदवार बदलायला लावले. यामुळे शिवसेनेत खदखद आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील माजी मंत्री सुरेश नवले यांनी आज ही खदखद जाहीरपणे व्यक्त करीत भाजपावर टीकास्त्र सोडले. भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चक्रव्युहात अडकावले असून त्यांचा अभिमन्यू झाला आहे. राज्यामध्ये शिवसेनेचा बळी देणं आणि शिवसेना संपविण्याचे कारस्थान भारतीय जनता पार्टी करीत आहे.

शिवसेना पक्ष संपवत आहे. आयबीचा रिपोर्ट, सर्व्हे निगेटिव्ह आहे, असे सांगून अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आली. कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी दिला आहे. परभणीची जागा रासपला दिली. नाशिकची जागा शिवसेनेची असूनही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडली जात आहे. रत्नागिरीची जागा भाजपाला सोडली आहे. भारतीय जनता पक्ष लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी ड्रामा करीत आहे. भाजपाच्या भट्टीमध्ये शिवसैनिकांचे बळी जात असल्याची टीका त्यांनी केली.

शिवसैनिकाला न्याय मिळत नाही म्हणून शिवसेनेत उठाव झाला. एकनाथ शिंदे यांच्या सोबत सगळे बाहेर पडले आणि सरकार अस्तित्वात आले; पण ज्या कारणासाठी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना सोडलं, ठाकरेंचं नेतृत्व झुगारलं, तेच इथेही होत असल्याने शिवसैनिकांमध्ये राग आहे, असे नवले म्हणाले.

…तर उद्या तुमचेही बळी जातील
आयबीचा रिपोर्ट, सर्व्हे निगेटिव्ह आहे म्हणत खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली. पुढे विधानसभेत संजय शिरसाट, अब्दुल सत्तार यासारख्या लोकांनाही तुमचे अहवाल चांगले नाहीत म्हणून तिकिट देऊ नका म्हणतील, असा इशारा नवले यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR