33.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeनांदेडमराठा आंदोलनाच्या वादळात ‘वसंत’ बहरणार की ‘प्रताप’?

मराठा आंदोलनाच्या वादळात ‘वसंत’ बहरणार की ‘प्रताप’?

अर्धापूर : नांदेड लोकसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या आंदोलनाची तीव्रता अजूनही कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत मराठा आंदोलनाच्या या वादळात काँग्रेसचा ‘वसंत’ बहरणार की ‘प्रतापी’ वारे वाहणार, हे प्रत्यक्ष वेळच सांगणार आहे. मात्र या मतदारसंघात लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

नांदेड लोकसभेवर दोन पंचवार्षिक योजनेत भाजप आणि एकवेळ जनता दलाचा खासदार वगळता येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यंदा या लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीकडून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन उमेदवारांत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. तर या निवडणूक प्रचारादरम्यान मराठा आरक्षणाचा सामाजिक मुद्दा उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरू लागला आहे. आंदोलनकर्ते राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधींना तीव्र विरोध करून त्यांना गावबंदी करीत आहेत. त्यामुळे उमेदवारांसह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संतप्त मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

राज्यभरातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनात सकल मराठा समाज ताकदीनिशी रस्त्यावर उतरला आहे. एकूणच मराठा समाजाने राजकीय पुढारी आणि सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधात दंड थोपटले असून आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना गावागावात अडविले जात आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या मराठा आंदोलकांची चांगलीच धास्ती घेतली असून उमेदवारांची मात्र दमछाक होताना दिसत आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे खेड्यापाड्यातील मराठा समाज एकवटला आहे. समाजाची एकजूट आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून दाखवून द्यायची, असा संकल्प मराठा समाजाने घेतला आहे. जर हा संकल्प पूर्ण झाला तर यातून कोणाचं चांगभलं होणार आणि कोणाला फटका बसणार? या प्रश्नाची उतरे काळच देईल. आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलनाच्या वादळात काँग्रेसचा ‘वसंत’ बहरणार की भाजप ‘प्रताप’ दाखवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल असेच दिसते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR