लातूर : प्रतिनिधी
मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, कृषि विज्ञान केंद्र लातूर येथे ‘व्यावसायिक कुक्कुटपालन’ या विषयावर चार दिवसीय प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात लातूर जिल्ह्यातील विविध गावांमधील शेतकरी व युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणीचे कुक्कुटशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक, डॉ. खोसे के.के, कृषि विज्ञान केंद्र लातूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख संदिप देशमुख यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी डॉ. खोसे यांनी कुक्कुटपालन व्यवसायातील संधी व या व्यवसायात शेतक-यांची आर्थिक प्रगती साध्य करण्याची असलेली क्षमता विषद केली. देशमुख यांनी कुक्कुट उत्पादनाचे वाढते महत्त्व, अन्नातील पोषणमूल्ये तसेच दुष्काळी परिस्थितीत शेतीसोबत आर्थिक स्थैर्य देणारा पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन महत्त्वाचे असल्याने शेतक-यांनी या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन केले. या प्रशिक्षणात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. के.के. खोसे, डॉ. राम कुलकर्णी, डॉ. ए.डी. तेरखेडकर, डॉ. एस.एच. स्वामी, डॉ. विजय जाधव, डॉ. श्रीधर शिंदे व डॉ. शरद साळुंके यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

