मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येत आहेत. मंडळाकडून इयत्ता बारावीच्या प्रमाणपत्र लेखी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरात एकूण ४२ कॉपीच्या गैरप्रकाराची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.
विभागनिहाय आकडेवारी पाहता, पुणे विभागात सर्वाधिक २० प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. अमरावती विभागात १२, नाशिकमध्ये ४, नागपूरमध्ये १, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ आणि लातूर विभागात २ प्रकरणे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागात एकही गैरमार्ग प्रकरण नोंदलेले नाही.
मंडळाकडून परीक्षेदरम्यान कडक उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. केंद्र संचालक, पर्यवेक्षक, भरारी पथके तसेच व्हीडीओ निरीक्षण यंत्रणेमुळे परीक्षेतील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात काही ठिकाणी यश आले पण काही ठिकाणी यश आले नाही.
बीडमध्ये परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट
बीड तालुक्यातील चौसाळा येथील आर्टस् अँड सायन्स या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे दिसून आले. तरुण मंडळींनी नातेवाईकांना कॉप्या पुरवण्यासाठी कॉलेजच्या बाहेर एकच गर्दी केली होती. एका दृश्यामध्ये परीक्षा केंद्राच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात काही तरुण कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कॉपी देत असल्याचे दिसत होते.
उत्तर महाराष्ट्रात केसेस अधिक
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर (ता.कन्नड) इथल्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्हीसमोर मास कॉपीची, तर अहिल्यानगर नऊ, तर जळगाव जिल्ह्यात चार कॉपीबहाद्दरांवर कारवाईची नोंद घेण्यात आली.
दक्षता समितीच्या आदेशानुसार केंद्रसंचालकासह तब्बल १९ जणांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून, पहिल्याच पेपरला झालेली ही आजपर्यंतची सर्वांत मोठी परीक्षा-संबंधित कारवाई आहे.
शिक्षणाधिका-यांचा सूचक इशारा
जिल्ह्यातील गैरप्रकार करणा-या इतर केंद्रांसाठी शिक्षण विभागातून कडक इशारा देण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रावरील हालचालीवर नजर ठेवली जात असून, परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
जळगावात चार कॉपीबहाद्दर
नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे कॉपीची चार प्रकरणे आढळली असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये शिक्षण मंडळाला कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे केंद्रावर चार कॉपीबहाद्दर आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अहिल्यानगरमध्ये नऊ विद्यार्थ्यांवर कॉपी केस
अहिल्यानगरमध्ये बारावीच्या परीक्षेत पहिल्या दिवशी जिल्ह्यात नऊ विद्यार्थ्यांवर कॉपी केस करण्यात आल्या. पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात कॉपी केसचे प्रकार आढळले. १ हजार १४३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. पाथर्डी तालुक्यात सात कॉपी केस आढळून आल्या. शेवगाव तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

