28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषअभिनेत्रींची राजकीय इनिंग

अभिनेत्रींची राजकीय इनिंग

सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला भाजपातर्फे हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून स्वरा भास्करला उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याखेरीज भाजपाने मथुरा लोकसभा मतदारसंघातून हेमा मालिनी यांना तिस-यांदा रिंगणात उतरवले आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी ग्लॅमरची दुनिया सोडून राजकारणात हात आजमावण्याचा विचार केला आणि आता त्यांनी राजकारणी म्हणून ओळख मिळवली आहे. निवडणुकांमध्ये स्टार कॅम्पेनर म्हणून झळकून दमदार कमाई करणा-या अभिनेत्रींनी राजकारणाकडे आपला मोर्चा वळवल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांचा वेध घेणारा लेख.

लिवूड आणि राजकारण यांचे नाते खूप वर्षांपासून चालत आलेले आहे. चित्रपटांमधील अभिनयाच्या माध्यमातून मिळालेल्या स्टारडमचा फायदा घेण्यासाठी सिनेकलावंतांना राजकारणात आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष उत्सुक असतात. निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार, भोजपुरी कलाकार यांना स्टार प्रचारक म्हणून आणून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. यामध्ये खास करून अभिनेत्रींना झुकते माप दिले जाते. त्याचबरोबर काही अभिनेत्रींनी निवडणुकांच्या माध्यमातून सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केल्याचीही उदाहरणे पाहायला मिळतात. राजकीय पक्षांकडूनही अनेक अभिनेत्रींना निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्याबाबत उत्सुकता दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही राजकारणात रूढ झालेला हा प्रवाह पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला भारतीय जनता पक्षातर्फे हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कंगनाचा आजवरचा प्रवास रंजक आणि संघर्षमय राहिला आहे. कंगना सधन घरात जन्मली. घरात राजकीय पार्श्वभूमीही होती. पण लहानपणापासूनच अभिनय, कलेची आवड असल्याने तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. कंगनाचा जन्म हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात झाला आणि आता याच मतदारसंघात तिला तिकिटही देण्यात आले आहे. कंगनाची आई शाळेत शिक्षिका होती. पण तरीही कंगनाला लहानपणापासून अभ्यासाची फारशी आवड नव्हती. बारावीत ती नापास झाली होती. त्यानंतर हिरोईन व्हायचं म्हणून घर सोडून ती मुंबईत आली. मंडी ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असे करत कंगना सिनेइंडस्ट्रीत आली आणि आघाडीची नायिका बनली. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँगस्टर’ सिनेमातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यानंतर वेगवेगळ्या भूमिका करत कंगनाने आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पुढे ‘फॅशन’ सिनेमातल्या भूमिकेसाठी कंगनाचं प्रचंड कौतुक झालं होतं.

या सिनेमासाठी तिला पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘क्वीन’ सिनेमासाठीही तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत पाच वेळा तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कंगना अनेकदा वादातही अडकली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर तिने बॉलिवूडमधल्या बड्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता. तर मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे विरुद्ध कंगना असाही वाद रंगला होता. मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगनाने ‘उद्धव ठाकरे, आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा’ असे म्हणत एकेरी शब्दांत त्यांचा उल्लेख केला होता. भारताला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, असं वक्तव्यही मध्यंतरी कंगनाने केलं होतं. त्यानंतर तिने राजकीय मुद्यावर बोलायला सुरुवात केली. भाजपच्या समर्थनार्थ ती अनेकदा बोलताना दिसली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अनेकदा तिनं भेटीही घेतल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कंगना लोकसभेच्या रिंगणात दिसू शकते अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या, अखेर त्या ख-या ठरल्या. तसं पाहायला गेल्यास कंगना आणि तिच्या कुटुंबासाठी राजकारण नवीन नाही.

कंगनाचे आजोबा सरजू राम मंडी जिल्ह्याच्या गोपाळपूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. आता कंगना भाजपाकडून लोकसभेत प्रवेश करते का हे पाहणे रंजक ठरणार आहे. यंदाच्या निवडणुकीत बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी यांनाही उत्तर प्रदेशातील मथुरा येथून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उमेदवारी देण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही हेमा मालिनी यांनी दणदणीत विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी ५,७४,६३३ मते मिळवली होती; तर २०१९ मध्ये ६,७१,२९३ मते मिळवत त्यांनी शानदार विजय नोंदवला. आता यंदा त्या खासदारकीची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या २००३ ते २००९ या काळात राज्यसभेच्या खासदारसुद्धा होत्या. १९९९ मध्ये हेमा मालिनी यांनी पहिल्यांदा पंजाबमधील गुरुदासपूर येथे लोकसभा निवडणुकीसाठी विनोद खन्ना यांचा प्रचार केला होता. हेमा मालिनी यांच्याप्रमाणेच बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनी २००९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या चंदिगडमधून २०१४ मध्ये लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. २०१९ मध्ये याच जागेवर पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी शानदार विजय मिळवला.

सिनेअभिनेत्रींप्रमाणेच छोट्या पडद्यावरील मालिका विश्वात आपला स्वतंत्र ठसा उमटवणा-या अभिनेत्री आणि दिग्दर्शक स्मृती इराणी यांनीही राजकारणामध्ये प्रवेश करून समकालीन आणि इतिहासातील सर्वच अभिनेत्रींपेक्षा सरस कामगिरी करून दाखवली. वास्तविक त्यांना पूर्वीच्या काळी बराच संघर्ष करावा लागला. घरातील आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी स्मृती इराणी यांनी एकेकाळी वेटरची नोकरीही केली. त्यानंतर काही काळ सौंदर्य प्रसाधने विकण्याचं कामही त्यांनी केलं. २००० साली एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू भी’ या मालिकेत त्यांना ब्रेक मिळाला आणि त्यांचं नशीब उजळलं. या मालिकेत तुलसी हे पात्र साकारून त्या घराघरांत पोहोचल्या. मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर २००३ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांना भाजपाच्या महिला विंगचं उपाध्यक्षपद देण्यात आलं. २०१० साली त्या भाजपा महिला विंगच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या राष्ट्रीय सचिव बनल्या. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपाकडून तिकिट मिळालं. अमेठीमधून काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात त्या उभ्या राहिल्या होत्या. परंतु, या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा तिकिट मिळालं. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत मते मिळवत राहुल यांना पराभूत करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम करण्यासह भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

सत्तर-ऐंशीच्या दशकातील चित्रपटांमध्ये आघाडीची नायिका राहिलेल्या जयाप्रदा यांनीही राजकारणामध्ये दीर्घकाळ व्यतीत केला आहे. हिंदी आणि तेलुगू सिनेमातल्या सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून जयाप्रदा यांची ओळख आहे. करिअरच्या शिखरावर असताना जयाप्रदा यांनी चित्रपटसृष्टीला सोडचिठ्ठी देत राजकारणात प्रवेश केला. रूपेरी पडद्यावरून राजकारणात आल्यानंतर सगळ्यात आधी त्या तेलुगू देसम पार्टीमधून (टीडीपी) राज्यसभेवर गेल्या. त्यानंतर समाजवादी पक्षात प्रवेश करून त्या रामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मार्च २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकदलाची साथ सोडली आणि त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या. बंगाली सिनेमातल्या ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चटर्जी यांनी जानेवारी २०१९मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मिळालेल्या तिकिटावर निवडणूक लढल्या होत्या; मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नायिकाही राजकारणाच्या मोहिनीपासून लांब राहू शकल्या नाहीत. तेलुगू सिनेमातील एक ज्येष्ठ अभिनेत्री जयासुधा यांनी ३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या काँग्रेस आणि तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि नंतर वायएसआरसीपीमध्ये काही काळ राहून नंतर भाजपमध्ये आल्या आहेत. तमिळ सिनेमातल्या दिग्गज अभिनेत्रींमधलं एक नाव म्हणजे खुशबू सुंदर. त्यांनी २०१० मध्ये डीएमके पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्या काँग्रेस पक्षात गेल्या होत्या. पुढे २०२० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सध्या त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य आहेत. बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरने जानेवारी २०१९मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपने तिची महिला वाहतूक शाखेची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती. हिंदी अभिनेत्री माही गिलने २०२२मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंजाबमधल्या मुलींसाठी भाजपबरोबर एकत्र राहून काही काम करण्याची इच्छा असल्याचे त्या वेळी या अभिनेत्रीने सांगितले होते. हरियाणवी नृत्यांगना, गायिका आणि अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सपना चौधरीने जुलै २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनय कारकीर्दीसाठी ओळखल्या जाणा-या मुनमुन सेन यांनीही ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि संसद सदस्या म्हणून काम केले. कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रम्यानेही काँग्रेसमध्ये प्रवेश करत सक्रिय राजकारणात उडी घेतली आणि खासदार म्हणून
काम केले.

बॉलिवूडमधील यशस्वी नायिका राहिलेल्या मराठमोळ्या ऊर्मिला मातोंडकरनेही राजकारणात नशीब आजमावून पाहिले; पण ती स्वत:ची खास छाप पाडू शकली नाही. ऊर्मिला मातोंडकरने २०१९ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि गोपाळ शेट्टींविरोधात मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली; पण ऊर्मिला मातोंडकरची जादू चालली नाही आणि तिचा पराभव झाला. यानंतर त्याच वर्षी ऊर्मिला मातोंडकर यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कारस्थानाचे कारण देत पक्षाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेत प्रवेश केला. गुल पनागने तिच्या आयुष्यात खूप यश मिळवले आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत चंदिगडमधून आम आदमी पक्षातर्फे तिने निवडणूक लढवली; मात्र तिला पराभवाला सामोरे जावे लागले.
बॉलिवूड आणि राजकारण यात काही प्रमाणात साम्य आहे असे म्हणता येईल. या दोन्ही ठिकाणी तुम्ही तुमची भूमिका चोख बजावली तर लोक तुम्हाला हिरो म्हणून स्वीकारतात. सिनेसृष्टीमध्ये अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकता येतात; तर राजकारणामध्ये लोककल्याणाला प्राधान्य देत जनतेचे प्रश्न सोडवावे लागतात. दोन्हीही ठिकाणी परफॉर्मन्स किंवा कामगिरी हाच यशाचा मूलमंत्र आहे. स्टारडमच्या जीवावर एखाद-दुसरी निवडणूक जिंकता येऊ शकते; पण दीर्घकाळ राजकारणात राहण्यासाठी जनसामान्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे अटळ आहे.

-सोनम परब, सिनेअभ्यासक

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR