36 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रआमचा पैलवान जड ठरतोय

आमचा पैलवान जड ठरतोय

संजय राऊत यांचा भाजपला टोला

मुंबई : सांगलीच्या जागेवरून अद्यापही महाविकास आघाडीतील तणाव शमलेला दिसत नाही. सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा ठाम दावा होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली. यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात बेबनाव झाल्याचे दिसून आले. मात्र, काँग्रेसकडून इच्छुक विशाल पाटील उमेदवारीवर ठाम राहिले आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

काँग्रेसने सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करण्याचे आदेश दिले, तर आमदार विश्वजीत कदम यांनी या निवडणुकीत शिवसेनेला जेवढी मते मिळतील, ती सर्व काँग्रेसची असतील, असे म्हटले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगलीच्या जागेवरून भाजपावर निशाणा साधला.

भाजपाने सांगलीत दोन उमेदवार उभे केले आहेत. आमच्या पैलवानाशी लढत द्यायला त्यांचा एक उमेदवार कमी पडत आहे. म्हणून त्यांनी दोन उमेदवार दिले. आमचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे भाजपाला जड जात आहेत. चंद्रहार पाटील झपाट्याने पुढे जात आहेत. भाजपाला सांगलीची निवडणूक सोपी जात नाही. त्यामुळेच लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवण्याचे कारस्थान रचले आहे. घराघरात लिफाफे वाटण्यासाठी भाजपाने अप्रत्यक्षपणे दुसरा उमेदवार आणला का अशी लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. या लिफाफ्यामागे कोण आहे? यामागे कोणाची प्रेरणा आहे? कोणाची ताकद आहे? याबद्दल लवकरच बोलू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या विरोधात काँग्रेसचे बंडखोरी करणारे विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल करण्यासाठीच सांगलीत आलो आहे. कार्यकर्ते आणि पदाधिका-यांशी चर्चा करून अहवाल तयार केला आहे. तो दिल्लीला पाठविणार असून, तेथून जो निर्णय होईल त्यानुसार विशाल पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कारवाई करणार आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR