34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रआ. प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

आ. प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

आमदार आक्रमक, आंदोलक जमावाला गेल्या सामोरे
पंढरपूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना गुरुवारी पंढरपूर येथे कथित मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. येथील सरकोली गावाजवळ कथित मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदे यांची गाडी घेरली. त्यांना गावात शिरण्यापासून मज्जाव केला. बराचवेळ उलटून आंदोलकांचा घोळका प्रणिती शिंदे यांच्या गाडीची वाट सोडायला तयार नव्हता. यादरम्यान काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हाताने जोरात फटके मारले. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या संतापाचा पारा चढला आणि त्या थेट गाडीतून उतरुन जमावाला सामो-या गेल्या.

प्रणिती शिंदे यांची गाडी सरकोली गावाजवळ आली तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. तुम्ही आमच्या गावात कशासाठी आलात, तुम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याची क्लीप दाखवा. आम्हाला गाडी फोडायला लावू नका, अशी आक्रमक भाषा वापरली जात होती. या जमावाकडून प्रणिती शिंदे यांना जाब विचारला जात होता. दरम्यानच्या काळात काही जणांनी आक्रमक होत प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर फटके मारायला सुरुवात केली. त्यावेळी प्रणिती शिंदे मागचा पुढचा विचार न करता गाडीतून खाली उतरल्या आणि माझ्या गाडीला हात लावायचा नाय, असे त्यांनी आक्रमक जमावाला खडसावून सांगितले. त्यानंतरही जमाव शांत होण्याचे नाव घेत नव्हता. परंतु प्रणिती शिंदे शेवटपर्यंत या जमावासमोर न डगमगता उभ्या राहिल्या.

आंदोलकांमध्ये घुसून भाजप
कार्यकर्त्यांचा गाडीवर हल्ला
प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. मराठा आंदोलकांमध्ये घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. यासंदर्भात पोलिस तक्रार करायची की नाही, याबाबत मी निर्णय घेईन. छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांनी ही शिकवण दिलेली नाही. त्यामुळे मराठा आंदोलक असे करणार नाहीत, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR