35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरउदगीर तालुक्यातील कार्यकर्ता होरपळला...

उदगीर तालुक्यातील कार्यकर्ता होरपळला…

उदगीर : बबन कांबळे
भर उन्हाळ्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत राजकारण तापले आहे. निवडणुकीच्या रंगात उमेदवाराबरोबर पक्षीय कार्यकर्ता पुरता होरपळत आहे तरी त्याचा उत्साह कायम दिसून येत आहे. शनिवारी (२० एप्रिल) उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी दिली असल्याने भारतीय काँग्रेसकडून गत पंचवार्षिकमध्ये विकासाचा मुद्दा घेऊन काँग्रेसकडून प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी देशमुखांनी डॉ. शिवाजीराव काळगेंना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसकडून डॉ. शिवाजीराव काळगे हा चेहरा नवा असला तरी त्यांची पाठराखण मात्र तगडी असल्याने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनात हुरहुर असलेले सुधाकर शृंगारे यांच्या पाठीवर निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व लातूरचे रमेश कराड यांची थाप असल्याने उमेदवारापेक्षा पाठीराख्यांचीच परीक्षा असल्याचे दिसून येत आहे.

विकासाचा मुद्दा चांगलाच गाजत असून गेल्या पाच वर्षांत गगनाला भिडलेली महागाई, शेतीमालाचे भाव, शेतकरी पीक विमा, सानुग्रह अनुदान, दुष्काळी मदत, महागलेले शिक्षण, असहाय्य झालेला आरोग्याचा विषय, जि. प. शाळा बंद पाडण्याचा डाव, शहरी विकास आणि गावे भकास, शेतक-यांवर झालेला अन्याय, महिलांची असुरक्षितता, यामुळे नाराज झालेला ग्रामीण भाग, हे मुद्दे आता ग्रामीण भागात चर्चेत असून हे मुद्दे निवडणुकीचे वातावरण आणखीनच तापवित आहेत. याचा सारासार विचार करून लातूरची फळी देशमुखांची आख्खी गढी कामाला लागली असून त्यांनी कार्यकर्त्यांना झाडून कामाला लागण्याचे फर्मानच काढले असल्याचे दिसत आहे.

या होऊ घातलेल्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असून राजकारण्यांना काही गावांनी प्रवेशही नाकारला आहे. या निवडणुकीत मराठा समाज आक्रमक झाला असून कोणत्याही नेत्याला गावबंदी करण्याच्या तयारीत असल्याचे वातावरण तयार होत आहे. मराठा समाजाला त्यांच्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवलेल्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

लिंगायत समाजाचे मतदान हे भारतीय जनता पक्षाची व्होट बँक असली तरी भारतीय जनता पक्षासाठी लीड करणारे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपने गमवायला सुरुवात केली आहे. निष्ठावंत कार्यकर्ते यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने कार्यकर्ता दुरावला जात आहे. याच संधीचे सोने करत भाजपच्या निष्ठेला चॅलेंज देत काही प्रभागांत काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे.

आता लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे अनुसूचित जातीतील माला जंगम या प्रवर्गातून आलेले उमेदवार आहेत. हे लिंगायत समाजाचे गुरू असून लिंगायत समाज डॉ. शिवाजीराव काळगे यांना मतदानरूपी दक्षिणा दिल्याशिवाय राहणार नाहीत. अन् मुस्लिम ही काँग्रेस पक्षाची व्होट बँक आहे. मागासवर्गीय+मुस्लिम +लिंगायत हा मामुली समाज सत्तापरिवर्तन करू शकतो तर मराठा समाजाचे आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तर महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांना पाडा असे संकेत संवाद बैठकीच्या माध्यमातून दिले आहेत. मराठा समाज ऐनवेळी कोणाच्या बोकांडी बसणार आहे हे चित्र स्पष्ट नसले तरी मराठा समाजाचा वार कोणता परिणाम दाखवेल हे वेळच ठरवणार असली तरी कार्यकर्ता मात्र धगीत होरपळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR