लातूर : प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी सध्या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. मशागतीसाठी डिझेल-पेट्रोलचा तुटवडा, पीकविमा मिळण्यात होणारा विलंब, कर्जमुक्तीच्या घोषणांची अपूर्ण अंमलबजावणी आणि सरकारकडून ठोस धोरणांचा अभाव अशा अनेक समस्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत मांजरा परिवाराने ऊस उत्पादक शेतक-यांना दिलेला आर्थिक आधार दिलासादायक ठरला असून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने त्याबद्दल मांजरा परिवाराचे प्रमुख माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे विशेष कौतुक केले आहे. मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्यांकडून उस उत्पादक शेतक-यांना प्रतिटन १०० रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप उसाचे पहिले बिलदेखील अदा केलेले नसताना मांजरा परिवाराने घेतलेला हा निर्णय शेतक-यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी सहकार आणि लोककल्याणाचा जो आदर्श निर्माण केला, तो माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आजही अखंडपणे सुरू आहे. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या सहकार्याने मांजरा परिवाराने शेतकरी व सर्वसामान्यांप्रती असलेली बांधिलकी जपली आहे.
लोेकनेते विलासराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विलासबाग, बाभळगाव येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि माजी आमदार धिरज देशमुख यांची संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कार्याध्यक्ष सत्तार पटेल, कोअर कमिटी सदस्य राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, प्रज्योत हुडे, नवनाथ शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सत्ता नसताना शेतक-यांना आपलेसे वाटणारे नेतृत्व म्हणजे दिलीपराव देशमुख
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे म्हणाले, लोकनेते विलासराव देशमुख यांनी आयुष्यभर लोककल्याणासाठी कार्य केले. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामागे दिलीपराव देशमुख यांची कायम भक्कम साथ राहिली. गेल्या १२ वर्षांहून अधिक काळ सत्ता नसतानाही विविध कारखाने, बँका आणि संस्था प्रगतीपथावर ठेवून त्यांनी लातूरकरांचा विश्वास जपला आहे. ते पुढे म्हणाले, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख शेतकरी आणि सर्वसामान्यांना कायम आपलेसे वाटणारे नेतृत्व आहे. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मांजरा परिवारातील सर्व कारखान्यांकडून शेतक-यांना १०० रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर करणे हीच त्यांना खरे अभिवादन ठरेल.
















