लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त लातूरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीचे औचित्य साधून विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर (निवळी) यांच्या वतीने लातूर येथील ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप करून एक आदर्श सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मंगळवार, दि. २६ मे रोजी सकाळी सर्वप्रथम विलास सहकारी साखर कारखान्याच्या स्थळावर लोकनेते विलासराव देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार वैजनाथराव शिंदे, आणि कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखाना स्थळावरील अभिवादन कार्यक्रमानंतर मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
विलास साखर कारखान्याने नेहमीच व्यावसायिक यशासोबतच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवली आहे, या अन्नधान्य वाटप उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी कारखान्याच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारानुसार सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या उपक्रमाप्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे संचालक सर्वश्री रविंद्र काळे, अमृत जाधव, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, रसुल पटेल, तात्यासाहेब पालकर, हणमंत पवार, नेताजी साळुंके (देशमुख), रामराव साळुंके, दीपक बनसोडे, शाम बरुरे, सुभाष माने व रमेश देशमुख यांच्यासह कारखान्यातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















