लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्याप्रती असलेली अथांग श्रद्धा व्यक्त करण्यासाठी धुळे येथील हेमंत सूर्यवंशी यांनी धुळे ते बाभळगाव (ता. लातूर) अशी शेकडो किलोमीटरची पायी पदयात्रा पूर्ण केली.
मंगळवारी सकाळी बाभळगाव येथील विलासबागेत पोहोचून सूर्यवंशी यांनी लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीस्थळी अत्यंत भावपूर्ण वातावरणात अभिवादन केले. हेमंत सूर्यवंशी यांनी पायी पदयात्रा करून बाभळगाव गाठल्याची माहिती मिळताच, राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सूर्यवंशी यांची बाभळगाव येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रती सूर्यवंशी यांनी व्यक्त केलेल्या या अनोख्या आणि निस्सीम भावनांचा आदर करत आमदार अमित देशमुख यांनी त्यांचे मनापासून आभार मानले. या प्रसंगी आमदार अमित देशमुख यांनी हेमंत सूर्यवंशी यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला. तसेच एवढ्या मोठ्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत काळजी घेण्याचे सुचवले. या प्रसंगी बाभळगाव निवासस्थानी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
















