30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीय विशेषकमल हसन यांचे दिवास्वप्न

कमल हसन यांचे दिवास्वप्न

  • ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी एमएनएम या राजकीय पक्षाची स्थापना करून राजकारणात पाऊल ठेवले. पक्ष स्थापन करताना कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही, असा संकल्प केला होता. मात्र पराभवातून धडा घेतला आणि ‘एकला चलो रे’ची भूमिका सोडत त्यांनी आता द्रमुकला पाठिंबा दिला आहे. भाजपला जेरीस आणण्यासाठी ते कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीत. केंद्रात यंदा बिगर भाजपचे सरकार स्थापन होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

कमल हसन हे भारतातील प्रसिद्ध अभिनेते. ते चित्रपटनिर्मिती, अभिनयात माहीर आहेत. गेल्या चार ते पाच दशकांत वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी वेळोवेळी प्रश्न मांडले आणि या कारणांमुळे त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. सहा वर्षांपूर्वी २१ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांनी नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. मक्कल निधी मईम म्हणजेच एमएनएम पक्षाच्या झेंड्यावर दक्षिण भारतातील पाच आणि एक केंद्रशासित (पुदुच्चेरी) राज्याचे प्रतीक असलेले हात एकमेकांना बांधील आहेत, असे चित्र आहे. बॅटरी हे त्यांचे निवडणूक चिन्ह. पक्षाचा सामाजिक न्यायावर भर राहिला आहे.

एमएनएमची स्थापना करताना कमल हसन यांनी दक्षिणेतील सहा राज्यांत बॅटरीच्या प्रकाशात स्वप्न पाहिले. मात्र त्यांचे हे दिवास्वप्नच राहिले. सहा वर्षांत सहा राज्ये सोडा, त्यांचेच राज्य तामिळनाडूतही त्यांना पाय रोवता आला नाही. कमल हसन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने २०१९ साली लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकले. परंतु त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. एकूण ४.२० कोटी मतांपैकी त्यांच्या उमेदवारांना १६१४७०८ म्हणजे ३.७२ टक्केच मते मिळाली. कोईमतूर येथे आर. महेंद्रन यांना सर्वाधिक १.४५ लाख मते तर इबेंझर येथील उमेदवाराला सर्वांत कमी ८५९० मते मिळाली. तसेच चेन्नई, कोइमतूर आणि मदुराईसारख्या शहरांत पक्षाचा प्रभाव असताना तेथे ८.५ टक्के ते १२.५ टक्के मते मिळाली. मात्र ग्रामीण भागात पक्षाची कामगिरी सुमार राहिली.

कमल हसन यांची कोणतीही जादू चालली नाही. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत एमएनएमची राजकीय गाडी पुन्हा घसरली. त्यांनी १४२ जागांवर उमेदवार उभे केले. परंंतु सर्वत्र पराभवाचा सामना करावा लागला. स्वत: कमल हसन यांनी कोइमतूर येथून निवडणूक लढली. विजयाची अपेक्षा असताना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अटीतटीच्या लढतीत भाजपचे व्ही. श्रीनिवासन यांनी त्यांना १७२८ मतांनी पराभूत केले. कमल हसन यांनी पक्ष स्थापन करताना कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही, असा संकल्प केला होता. मात्र या दुहेरी पराभवाने धडा मिळाला. त्यांनी परवर्ती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार इव्हीकेएम एलंगोवन यांना बिनशर्त पाठिंबा दिला. ‘एकला चलो रे’ची भूमिका सोडत त्यांनी आजच्या काळात द्रमुकला पाठिंबा दिला आहे.

कमल हसन हे द्रमुक आघाडीत आहेत, तेथे अगोदरच काँग्रेस व डावे असून व्हीसीके, एमडीएमके आणि आययूएमएलसारखे लहान पक्षही आहेत. हे पक्ष यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. भाजपला जेरीस आणण्यासाठी ते कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीत. कमल हसन यांना जातीवादाची कमालीची चीड आहे. भाजपला लोकशाही व्यवस्था आणि मूल्यांबाबत काही देणेघेणे नाही, असे कमल हसन यांना वाटते. त्यांनी तामिळनाडूच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आणखी एक संधी देऊ नये, असे आवाहन केले आहे. तामिळनाडूत भाजपचे खाते उघडणार नाही, याची त्यांना पूर्ण खात्री आहे. द्रमुक आघाडी विजयी होईल अणि केंद्रात बिगर भाजपचे सरकार स्थापन होईल, असे त्यांना वाटते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी द्रमुक आघाडीचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यांनी जागावाटपाचा मुद्दा सहजपणे निकाली काढला. मुलगा आणि मंत्री उदयनिधी हा त्यांच्या खांद्याला खांदा मिळवत पक्षाला यश मिळवून देण्यात मदत करत आहे. द्रमुकच्या करारानुसार पुदुच्चेरीची एकमेव जागा सहकारी पक्ष काँग्रेसला सोडली. तेथे काँग्रेसचे विद्यमान खासदार व्ही. वेथिलिंगम हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. उदयनिधी यांनी त्यांच्यासाठी विल्लानूर येथे रोड शो केला आणि पुदुच्चेरीच्या मतदारांना त्यांना पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. द्रमुक आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात पुदुच्चेरीला संपूर्ण राज्य देण्याची मागणी केली आहे.

दिल्ली आणि चेन्नईच्या संबंधाचा उल्लेख केला तर दोघांचे संबंध नेहमीच ताणलेले राहिले आहेत. दिल्लीच्या नेत्यांना स्टॅलिनचे वर्चस्व सहन होत नाही अणि चेन्नईच्या लोकांना दिल्लीबद्दल ब-याच तक्रारी असतात. दोन्ही बाजूंनी वादविवाद, आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असते. एट्टायापूरम येथील सभा असो किंवा अन्यत्र ठिकाणची सभा असो स्टॅलिन हे प्रत्येक ठिकाणी मोदी यांना लक्ष्य करतात. ते मोदींना धोकादायक, तमिळ हित विरोधी, हुकूमशहा म्हणतात. ते मोदी यांच्या फोनचा संदर्भ देत सांगतात की, मोदींनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले, परंतु एक कवडीदेखील दिली नाही. तामिळनाडूला केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांसाठी ३७ हजार कोटी रुपये येणे आहे. मदतीची वेळ निघून जात आहे. मदतीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. केंद्राकडून तामिळनाडूला एकप्रकारे सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. स्टॅलिन यांच्या अनुभव कथनामुळे त्याला बळकटी मिळत आहे. आर्थिक निधीवरून तामिळनाडूबरोबरच कर्नाटक अणि केरळचे अर्ज देखील सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहेत.

एकट्या तामिळनाडूत सुरुवातीपासून दोन द्रविड पक्षांत मुकाबला राहिला आहे. राज्यात निवडणुका संघर्षपूर्ण आणि खळबळ उडवून देणा-या मानल्या गेल्या. द्रमुक आघाडीला २०१९ मध्ये सुमारे ५३ टक्के मिळाली, त्यात एकट्या द्रमुकचा वाटा हा ३३.४ टक्के आहे. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी १२.५ टक्के होती तर अण्णाद्रमुक आणि घटक पक्षांची १९.४ टक्के. भाजपला राज्यात एकूण १५.५ लाख म्हणजे १.६ टक्के मते मिळाली. अशा बिकट स्थितीत भाजप यंदा राज्यात खाते उघडण्याचे मनसुबे आखत आहे. स्वत: पंतप्रधान मोदी हे तामिळनाडूला येण्याची एकही संधी सोडत नाहीत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई हे आपल्या घरापासून दूर कोइमतूर येथे निवडणूक लढवत आहेत. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे सदस्य एल. मुरुगन हे नीलगिरी येथून, माजी मंत्री पी. राधाकृष्णन कन्याकुमारीतून आणि पुदुच्चेरी तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिळसाई सुंदरराजन या दक्षिण चेन्नईतून निवडणूक लढवत आहेत. सुंदरराजन यांनी अलिकडेच राज्यपालपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

गेल्या निवडणुकीत द्रमुकला केवळ थेनी येथे पराभव स्वीकारावा लागला हाता. या ठिकाणी अण्णाद्रमुकचे रवींद्रनाथ कुमार विजयी झाले होते. या ठिकाणी टीटीव्ही दिनकरन नशीब आजमावत आहेत. द्रमुकने थेनीचा गड सर करण्यासाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही. भाजपने कोणत्याही स्थितीत तामिळनाडूत खाते उघडायचेच या हेतूने पीएमके, तमिळ मनीला काँग्रेस (मूपनार) आणि एएमएमके यांचा आधार घेतलेला आहे. अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी झालेले पनीरसेल्वम यांचा गटही भाजपच्या आघाडीत सामील आहे. ते रामनाथपूरम येथून मैदानात आहेत. दुसरीकडे चित्रपटनिर्माते सेंथमीलन सीमान यांनी आपला पक्ष तमिलर पक्ष बॅनरखाली ४० उमेदवार उभे केले आहेत. त्यात निम्म्यापेक्षा अधिक महिला आहेत. निवडणूक चिन्ह गमावलेले एमडीएमके केवळ एका जागेवर लढत आहेत.

एकंदरीत चित्र पाहिल्यास द्रमुक आघाडी सर्वच बाबतीत सरस असल्याचे दिसून येते अणि त्यांची निकालातील आघाडीही स्पष्टपणे दिसत आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणतात, तामिळनाडूत खरी लढत अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यातच आहे. भाजप इथे कोठेच दिसत नाही. मात्र भाजपच्या दाव्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे देखील तितकेच खरे. भाजपने तामिळनाडूत प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांनी प्रभावशाली चेहरे निवडले आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे आणि निधी देखील. ९ एप्रिलच्या मोदी यांच्या चेन्नई येथील रोड शोने द्रमुक आघाडीच्या नेत्यांना संभाव्य निकालाबाबत पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. आकर्षक रोड शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोदी आणि भाजप यांचा विरोध करण्याच्या मुद्यावरून तमिळ नेत्यांची भूमिका पाहिली तर कमल हसन हे स्टॅलिन यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. ते मोदींवर प्रखर टीका करत आहेत. मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास देशातील लोकशाही व्यवस्था आणि मूल्य धोक्यात येईल, असे ते म्हणत आहेत. कमल हसन यांच्या पक्षाने एकही उमेदवार उभा केला नाही. ते द्रमुक आघाडीत आहेत. या बदल्यात स्टॅलिन यांनी त्यांना एक जागा देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कमल हसन हे लवकरच राज्यसभेत दिसतील, असे गृहित धरा.

-के. श्रीनिवासन

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR