28.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीय विशेषकेजरीवालांच्या अटकेचे कवित्व

केजरीवालांच्या अटकेचे कवित्व

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण गैरव्यवहारप्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या चळवळीतून उदयास आलेले नेतृत्व एक दिवस स्वत:च भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात जाईल, याची कल्पना कोणी केली नसेल. मात्र आता ते तुरुंगात आहेत, हे वास्तव आहे. केवळ राजधानी दिल्लीच नाही तर देशातील जनतेची राजकीय नाडी चांगल्या रीतीने ओळखणा-या नेत्यांत केजरीवाल यांचा समावेश आहे. दिल्ली आणि पंजाब येथे सरकार स्थापन करत त्यांनी आपले राजकीय वर्चस्व दाखविले आहे. अशा वेळी केजरीवाल यांची अटक त्यांच्या पक्षासाठी आणि विरोधकांच्या आघाडीसाठी चितांजनक बाब आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण गैरव्यवहारप्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर काही तासांतच ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या चळवळीतून उदयास आलेले नेतृत्व एक दिवस स्वत:च भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात जाईल, याची कल्पना देखील आंदोलनाच्या काळात कोणी केली नसेल. मात्र आता ते तुरुंगात आहेच, हे वास्तव आहे. अर्थात अशा कारवाईची शक्यता काही महिन्यांपासून केली जात होती आणि घडलेही. केजरीवाल यांचे दोन राज्यांत सरकार आणि तीन राज्यांत महापौर अणि राज्यसभेचे सदस्य आहेत. ही बाब त्यांनी तेरा वर्षांतच साध्य केली. मात्र या काळात कायम त्यांच्यावर वादाचीही सावली राहिली.

आम आदमी पक्षाची स्थापना केली तेव्हापासून वाद निर्माण होत गेले. २०१२ मध्ये राजकीय पक्षाची स्थापना करताच समाजसेवक अण्णा हजारे त्यांच्यापासून बाजूला झाले. केजरीवाल यांच्यापासून दूर जाणारे ते पहिले व्यक्ती होते. ‘आप’ची स्थापना झाल्यानंतर कमी वेळातच या पक्षाचा विस्तार झाला, पण पुढे उत्पादन शुल्क धोरणाच्या गैरव्यवहाराच्या गर्तेत अडकला जाईल आणि त्याची अशी गत होईल, याचा कोणी विचारही केला नव्हता. या प्रकरणात पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांना तुरुंगात पाठविल्यानंतर केजरीवाल यांना अटक झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ‘आप’साठी सर्वस्व आहेत. वास्तविक देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल फुंकलेले असताना केजरीवाल यांच्यावरील कारवाई ‘आप’बरोबरच ‘इंडिया’ आघाडीलाही धक्का आहे. पहिल्या टप्प्यात १०२ लोकसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अशावेळी ही कारवाई विरोधकांच्या प्रचाराच्या वेगाला ब्रेक लावणारी ठरू शकते. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात केजरीवाल यांच्यावरील कारवाई हा एक मुद्दा म्हणून भाजप आणि विरोधकांकडून समोर आणला जात आहे. या कारवाईमुळे ‘आप’च्या प्रचार मोहिमेवर परिणाम तर होईलच. कारण पक्षाचा चेहरा केजरीवाल आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्ष पूर्ण क्षमतेने निवडणूक लढवत आहे. अशावेळी केजरीवाल यांच्या अटकेने आम आदमी पक्षासमोर अडचणी वाढल्या तर ‘इंडिया’ आघाडीला धक्का बसला आहे. ‘आप’ हा ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचारावरही परिणाम होणार आहे. मतदारांना आकर्षित करणे आणि त्यांना आपल्या बाजूने खेचून घेण्यात केजरीवाल निष्णात आहेत. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात ‘आप’चे कार्यकर्ते अणि नेते आंदोलन करत आहेत. तसेच विरोधी पक्ष देखील एकत्र झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीतही केजरीवालांच्या अटकेनंतर पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. अटकेची कारवाई झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबाशी फोनवरून चर्चा केली. राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला असून त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करताना म्हटले, ‘‘भयभीत हुकूमशहा, एक मृत लोकशाही बनवू पाहत आहे. प्रमुख विरोधी पक्षाची खाती गोठवणे हे काय असुरी शक्तीसाठी कमी होते म्हणून त्यांनी मुख्यमंत्री तुरुंगात टाकण्यास सुरुवात केली. निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची अटकही आता सामान्य झाली आहे. ‘इंडिया’ आघाडीने याचे चोख उत्तर द्यावे.’’

राहुल गांधी आणि प्रियंका गांधीच नाही तर ‘इंडिया’ आघाडीत सामील असलेल्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. ‘इंडिया’ आघाडीतील केजरीवाल यांच्यावर टीका करणारे देखील आता मोकळेपणाने ‘आप’ समवेत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुलांपासून काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी देखील केजरीवाल यांच्या अटकेवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणात ज्या रीतीने राहुल गांधींपासून प्रियंका गांधींसह ‘इंडिया’ आघाडीचे सर्व नेत्यांनी केजरीवाल यांना साथ दिली, ते पाहता आगामी काळात राजकीय वाटचालीचा अंदाज बांधता येऊ शकतो. केजरीवाल यांच्या अटकेनंतर ‘इंडिया’ आघाडी भविष्यातील वाटचालीबाबत रणनीती आखू शकते. केजरीवाल यांच्या अटकेचे ‘टायमिंग’ ही लक्षात घ्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. अशावेळी विरोधकांना मोदी सरकारविरुद्ध आक्रमक होण्याची संधी मिळाली आहे. ‘केजरीवाल यांची अटक’ हाच मुद्दा करण्याचा प्रयत्न केला जाईल. याच मुद्यावर ‘इंडिया’ आघाडी जनतेसमोर जाईल आणि त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल. एकंदरीतच केजरीवाल यांच्या अटकेचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला जाईल, हे स्पष्ट आहे.

‘आप’ने ज्याप्रमाणे मनीष सिसोदिया, संजय सिंह यांच्या अटकेचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी देखील केजरीवाल यांच्या अटकेचा मुद्दा करण्यास प्रारंभ केला. राजकीय तज्ज्ञांच्या मते, विरोधकांची आघाडी केजरीवाल यांचा मुद्दा करू इच्छित आहे. हा मुद्दा वेगवेगळ्या राज्यांत जनतेसमोर मांडला जाऊ शकतो. या आधारे मोदी सरकार आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. केजरीवाल यांची अटक म्हणजे सत्ताधा-यांनी रचलेले कारस्थान असून ही बाब सांगण्यात विरोधकांची आघाडी यशस्वी ठरली तर त्यांना राजकीय फायदा मिळू शकतो. मात्र यात अपयश आले तर त्यांना मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागेल.

अरविंद केजरीवाल हे भाजपला थेट आव्हान देणारे नेते म्हणून ओळखले जातात. दिल्लीच्या तीन विधानसभा निवडणुका, एमसीडी आणि चंदिगड महापौर निवडणुकीत भाजपला मात देण्यात केजरीवाल यांना यश आले आहे. मोदी लाट असताना एकीकडे भाजप आणि दुसरीकडे काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष असतानाही केजरीवाल यांना दिल्ली आणि पंजाबचा किल्ला सर करण्यात यश आले आहे. पण केजरीवाल दिल्लीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. केजरीवाल हे ‘आप’चे चाणक्य मानले जातात आणि ते भाजपला हरविण्याची हातोटी जाणून आहेत. केजरीवाल यांनी वेळोवेळी भाजप आणि मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मग निवडणुकीची प्रचार सभा असो किंवा प्रसारमाध्यम असो. केवळ राजधानी दिल्लीच नाही तर देशातील जनतेची राजकीय नाडी चांगल्या रीतीने ओळखणा-या नेत्यांत केजरीवाल यांचा समावेश आहे. दिल्ली अणि पंजाब येथे सरकार स्थापन करत त्यांनी आपले राजकीय वर्चस्व दाखविले आहे. अशा वेळी केजरीवाल यांची अटक त्यांच्या पक्षासाठी आणि विरोधकांच्या आघाडीसाठी चिंताजनक बाब आहे. या आघाडीत सामील असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे अगोदरपासूनच तुरुंगात आहेत. सोरेन देखील आघाडीचे मोठे चेहरे आहेत आणि त्यांनी झारखंडमध्ये भाजपला पराभूत करत सरकार स्थापन केले.

या अटकेचा भाजपावर विपरित परिणाम होईल असे विरोधक म्हणत असले तरी खुद्द काँग्रेसने या घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांवर टीका केली आहे. तसेच आजवर हेच विरोधी पक्ष ‘आप’ला भाजपची ‘बी’ टीम म्हणत आले आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे विरोधकांची सोयीस्कर आणि दुटप्पी भूमिका जनतेपासून लपून राहिलेली नाही. यामध्ये मुख्य मुद्दा आहे तो पारदर्शकतेचा. त्याबाबत तपास यंत्रणांकडून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि न्यायालयात ‘आप’च्या नेत्यांवरील आरोप टिकतात का हे पाहावे लागेल.

– व्ही. के. कौर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR