30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीय विशेषपडण्याची चर्चा

पडण्याची चर्चा

निवडणूक हा खरोखर ‘उत्सव’ आहे आणि इतर उत्सवांप्रमाणेच यातसुद्धा ‘रंगत’ असते, हे आता चांगलंच जाणवायला लागलंय. रणांगणावर जाण्यापूर्वी जसे योद्ध्यांचे बाहू फुरफुरतात, तशा ‘रंजनपरायण’ नेत्यांच्या जिव्हा सळसळू लागल्यात. कधी एकदा माईक समोर येतो आणि आपण टीआरपी वसूल करतो, या चिंतनात ते दबा धरून बसलेत. ब-याच जणांनी ‘हेडलाईन’ होतील असे मुद्दे जमवूनही ठेवलेत; पण तोफेला बत्तीच देता येत नाही अशी अवस्था झाल्यामुळं हा दारूगोळा आतल्या आत खदखदतोय. कोण कुठून लढणार, कोणत्या चिन्हावर लढणार, कोण कुणाचं काम करणार, कोण करणार नाही, कोण नाराज होणार, कोण यू-टर्न घेणार वगैरे बाबी येत्या काही दिवसांत हळूहळू स्पष्ट होत जातील. पक्षांची आणि आघाड्यांची चेहरेपट्टी एकदा निश्चित झाली, की मेकअप करून प्रयोगाला सुरुवात होईल. फेरबदल किंवा भूकंप वगैरे शब्दही आता प्रभावशून्य ठरलेले असल्यामुळं नव्या भिडूंना नव्या घरात ‘अ‍ॅक्लमटाईज्’ होणं आता पूर्वीसारखं अवघड राहिलेलं नाही. त्यामुळं पडदा उघडण्यापूर्वीचा अंकही टाळ्या आणि हशा वसूल करतोय. मतदानाच्या दिवसापर्यंत आपलं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं, हे आव्हान असतंच.

खचून वगैरे जाऊ नका. शेजा-याच्या घरात डोकवा. आपल्या घराप्रमाणेच शेजा-याचं घरही दु:खात आहे, हे पाहणंही आपल्यासाठी उत्सवच असतो. २०२४ मध्ये जगातल्या अनेक देशांमध्ये निवडणुका होतायत आणि त्यात आपल्या सर्वांच्या लाडक्या अमेरिकेचाही समावेश आहे. तिथं कोणता मुद्दा गाजतोय, ठाऊक आहे का? विद्यमान अध्यक्षांच्या ‘पडण्याचा’! जगाला नवल वाटतंय, मतदानापूर्वीच पडण्याची चर्चा कशी? पण विरोधकांचा मुख्य मुद्दा विद्यमान अध्यक्षांच्या आरोग्याशी निगडीत आहे आणि त्यांचं वारंवार पडणं हा मुद्दा त्यांनी चांगलाच लावून धरलाय. आपल्या कार्यकाळात विद्यमान अध्यक्ष विमानाच्या पाय-या चढताना तीनदा पडले. इंडोनेशियात झालेल्या जी-२० परिषदेवेळी एकदा पडले. एका अधिकृत भेटीदरम्यानही त्यांचा तीन वेळा तोल गेला. त्यांचे हे पडण्याचे प्रसंग विरोधकांनी नोंदवून ठेवलेत आणि ते वारंवार सांगून विद्यमान अध्यक्षांची शारीरिक, मानसिक प्रकृती चांगली नाही, हे पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तोल जाऊ नये म्हणून अध्यक्षांसाठी मुद्दाम बनवून घेतलेल्या बुटांचीही सध्या जोरकस चर्चा आहे. हे मऊ तळव्याचे बूट अर्थात ‘स्रीकर्स’ १३ हजार रुपये किमतीचे आहेत म्हणे! या बुटांवरूनही वाद सुरू झालाय.

या बुटांची वैशिष्ट्यं सांगणा-या ‘स्टो-या’ अमेरिकी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्यात. या बुटांमुळे जास्तीत जास्त सपोर्ट आणि कम्फर्ट कसा मिळतो, त्यामुळं संतुलन कसं राखलं जातं आणि त्यामुळं पडण्याचा धोका कसा कमी होतो, अशी वर्णनं भरभरून छापून आलीयेत. रुंद तळव्यांच्या आणि चांगली ग्रिप असलेल्या या बुटांनी अध्यक्षांना चालताना पाडलं नाही, तरी निवडणुकीत पाडावं, अशी व्यूहरचना खुद्द अमेरिकेत सुरू आहे. आपल्याकडे प्रचारानं जोर पकडल्यावर कशाकशाची चर्चा होईल, याची हुरहुर आतापासूनच मतदारराजाला लागून राहिली आहे.

– हिमांशू चौधरी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR